Lonavala News : लोणावळ्याच्या कार्यकर्ता शिबिरात  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुन्हा स्वबळाचा नारा

Lonavala News : लोणावळ्याच्या कार्यकर्ता शिबिरात  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुन्हा स्वबळाचा नारा

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कामाला येत नाही

Pckhabar- मी एकदा बोललो की मग माझी माघार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढाईच्या कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिकांना स्वबळाचा नारा दिला आहे, तेच मी देखील बोललो तर मग यांना त्रास का होतो, असा प्रश्न करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला.

लोणावळ्यात शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आय पक्षाच्या तालुकास्तरीय कार्यकर्त्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला नाना पटोले हे नियोजित वेळेपेक्षा तब्बल ५ तास उशीरा पोचल्याने हा मेळावा रात्री सव्वा बारा पर्यंत सुरू होता.

या मेळाव्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, सत्यशील शेरकर, पृथ्वीराज पाटील, संग्राम मोहळ, महेश ढमढेरे, माऊली दाभाडे, लोणावळा उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, नगरसेवक निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, डॉ.किरण गायकवाड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लोणावळ्याचे नवनिर्वाचित काँग्रेस शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचा पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहे. ते कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कामाला येत नाही. कमिटीवर राहायचं असेल तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास पालकमंत्री देतात त्या त्रासाला तुम्ही आपली ताकत बनवा आणि काँग्रेस चा पालकमंत्री आणून दाखवण्याचा सल्ला नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना देत पालकमंत्री अजित पवार यांच्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली.

लोणावळ्यातील चिक्की फार प्रसिद्ध आहे. मात्र ती मागच्या सरकार मध्ये जास्त प्रसिद्ध होती. आता त्या चिक्कीचे काय हाल झाले तुम्हीच बघा असं विधान करीत पटोले यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना चिमटा काढला. पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर सेनेचा असेल असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊतांनी घेतलेली एकला चलोरेची भूमिका वाईट नाही, प्रत्येकाला स्वबळावर लढायचा अधिकार आहे असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *