Hinjawadi Crime News : टेम्पो चोरणारी टोळी जेरबंद;  80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Hinjawadi Crime News : टेम्पो चोरणारी टोळी जेरबंद;  80 लाखांचा मुद्देमाल जप्त
Pckhabar- इनोव्हा मोटारीने येऊन बनावट चावीने टेम्पो, ट्रक चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळ्या असून त्यांच्याकडून हायवा, आयशर ट्रक यासह 7 चारचाकी वाहने एक दुचाकी असा 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश अर्जुन पुरी (वय-28, रा. महम्मदपुर पाटी, ता. चाकुर, जि. लातूर), मुजुब महम्मद शेख (वय-38, रा. लातुर), प्रकाश नारायण गिरी (वय-31, रा. हासेगाववाडी, ता. औसा. जि. लातुर), कुशल अभिमन्यु जाधव (वय-32, रा. मुळशी खुर्द), जितेंद्र कृष्णकुमार यादव (वय-22, रा. काटेपुरम चौक, सांगवी), जमशेद ऊर्फ फिरोज युनुस खान पठाण (वय-38, रा. गालीबनगर, उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून ट्रक, टेम्पोसह इतर वाहने चोरीला जात असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. इनोव्हा मोटारीने चोरटे येऊन ट्रक, टेम्पो चोरून नेत होते. याचा हिंजवडी पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार ओमप्रकाश कांबळे यांना माहिती मिळाली की आरोपी वारजे आणि हिंजवडी परिसरात चोरी करण्यासाठी येणार होते. त्यानुसार पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर सापळा लावला. पहाटेच्या सुमारास संशयित इनोव्हा आली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग केल्यानंतर आरोपी गाडी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले.

  आरोपींकडे कसून तपास केल्यानंतर त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, लातूर या ठिकाणी वाहने चोरी केल्याचे कबूल केले. आरोपी इनोव्हा मोटारीने येऊन बनावट चावीने टेम्पो, ट्रक चोरून नेत होते. वाहनातील जीपीएस सिस्टीम काढून रस्त्याने जाणार्‍या इतर वाहनामध्ये टाकून देत होते. आरोपींकडून हायवा, आयशर ट्रक यासह 7 चारचाकी वाहने एक दुचाकी, मिर्ची स्प्रे, स्क्रु डायव्हर, वायरकटर, होतोडा, एक्सा कटर, 10 ब्लेड, बनावट चाव्या, पान्हे, असा  80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.  यातील आरोपी कुशल जाधव, गणेश पुरी, प्रकाश गिरी हे सराईत गुन्हेगार आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड, सागर काटे, समाधान कदम, महेंद्र गाढवे, महेश वायबसे, बंडु मारणे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *