Rto News : दुचाकी वाहनांसाठी सुरु होणा-या JS मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Rto News : दुचाकी वाहनांसाठी सुरु होणा-या JS मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Pckhabar-दुचाकी वाहनांसाठी सुरु होणा-या JS मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरीता तसेच उर्वरित क्रमांकासाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

पुणे , पिंपरी-चिचवड, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व ब-याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी दिनांक 13 जुलै 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.
दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी दिनांक 14 जुलै 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
वरील अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डीडी DY.R.T.O.PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे नॅशनलाईज/ शेडयुल्ड बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची (उदा. आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.
चारचाकीची यादी दिनांक 14 जुलै 2021 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर सकाळी 11 वाजता लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक 14 जुलै 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा .डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
तसेच दुचाकीची यादी दिनांक 15 जुलै,2021 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर सकाळी 11 वाजता लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक 15 जुलै, 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दोष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावे.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रदद होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही पुणे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *