Akurdi News : सहकार खाते केंद्रात काढून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू : संजय राऊत

Akurdi News : सहकार खाते केंद्रात काढून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू : संजय राऊत
Pckhabar- सहकार हे राज्य घटनेमध्ये राज्याचा विषय आहे. मात्र, केंद्रात सहकार खाते केंद्रात काढून या क्षेत्राला खतम करायचे असेल तर हा मोठा धोका असून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू, असे आव्हान शिवसेना खासदार, पश्चिम उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख संजय राऊत यांनी भाजपला दिले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या ईडीकडून चौकश्या होत आहेत. ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही त्यांचे पत्ते आहेत. ते आम्ही त्यांना चौकशीसाठी देऊ, असेही राऊत म्हणाले.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आढावा बैठकीसाठी आज
(शुक्रवार) राऊत शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख पुणे जिल्हा बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, विजय देशमुख, संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहूल कलाटे, सह संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड योगेश बाबर आदी उपस्थित होते.

राऊत पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची आता ताकद जास्त आहे म्हणजे ती सूज आहे. उद्या काय होईल, भाजपचे अनेक राष्ट्रवादीत किंवा दुसर्‍या पक्षात जातील, हे तुम्हालाही चांगले माहीत आहे. इथले सगळे भाजपवाले ठेकेदारीत गुंतलेले आहेत. हा आमचा धंदा नाही, म्हणून अबाधितपणे मुंबईत आहोत, असे ते म्हणाले. येथे महाविकास आघाडीबाबत निर्णय योग्यवेळी घेऊ.

यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये महापौर बसवायचाच. त्याअनुषंगाने शिवसैनिक कामाला लागलेत. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड या मुद्द्यावर आगामी महापालिका निवडणूक लढणार असल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *