Pimpri News : ‘संतपीठ’च्या प्रवेशासाठी १५ हजार रुपयांचे शिक्षण शुल्क रद्द करा: संजोग वाघेरे

Pimpri News : ‘संतपीठ’च्या प्रवेशासाठी १५ हजार रुपयांचे शिक्षण शुल्क रद्द करा: संजोग वाघेरे
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सुरू होत असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठात पूर्व प्राथमिक वर्गासाठी वार्षिक शिक्षण शुल्क प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये घेण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा घेतला जाणार आहे. महापालिकेच्या या उत्कृष्ट उपक्रमाला खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे व्यावसायिक रुप येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे ‘संतपीठ’च्या प्रवेशासाठी १५ हजार रुपयांचे हे शिक्षण शुल्क आकारणीचे धोरण रद्द करण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे  यांनी केली आहे.

 वाघेरे  यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत आहे. संतपीठ इमारतीचे काम अपूर्ण असताना संतपीठ सुरू करण्याची घाई महानगरपालिका प्रशासन, संतपीठ संचालक मंडळ आणि याचे श्रेय घेऊन पाहणा-या मंडळीकडून सुरू आहे.

संतपीठातील प्रवेश प्रक्रीयेला १४ जुलै रोजी सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह संतपीठात शिक्षण घेणा-या पूर्व प्राथमिक वर्गासाठी वार्षिक शिक्षण शुल्क प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये घेण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा घेतला जाणार आहे. या पध्दतीचे धोरण संतपीठाबाबत जाहीर करण्यात आल्याचे समजले आहे.

संत विचाराचा प्रचार प्रसार व्हावा.  मुल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत हा वेगळा प्रयोग आपण करत आहोत. तसे असताना खासगी शिक्षण संस्थेप्रमाणे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आकारणी व साहित्याचा खर्च घेतला जाणे अयोग्य आहे. ही महत्त्वपूर्ण बाब संतपीठ संचालक मंडळातील सर्व सदस्य, संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि महानगपालिका आयुक्त यांनी विचारात घ्यावी, असे संजोग वाघेरे  यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *