Pimpri News : गॅस दरवाढीविरोधात माकपचे आंदोलन, सबसिडी पुन्हा सुरू करण्याची मागणी
Pckhabar- सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल बरोबर घरगुती गॅसच्या किमती 35 टक्यांनी वाढवल्या आहेत. गॅस सिलिंडरचा 835 रूपये झाला आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेला आहे. रोजंदारी कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, बिगारी कुटुंबाना आर्थिक दिलासा न देता केंद्र सरकारने महागाईचे भूत स्वयंपाक घरात आणून सोडले आहे. एका वर्षात 200 रुपयांची सिलिंडरची दरवाढ करून सामान्य कुटुंबाची सरकारने चूल बंद केली आहे, असा आरोप माकपच्या महिला नेत्या अपर्णा दराडे यांनी पिंपरी येथे केला. तसेच घरगुती गॅस दरचे कमी करा अथवा 250 रु अनुदान द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आज (गुरूवार) पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मोदी सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात केली.
जुलै 2020 मध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 637 रु होती. संपूर्ण वर्षात सरकारने इंधनदरवाढ करून जनतेला मेटाकुटीस आणले आहे. केंद्रसरकरने एक वर्षात 3 लाख कोटी रुपयांची कमाई इंधन आणि गॅस दरवाढीतून केली आहे. जनता संतप्त आहे. महिला गृहिणी त्रस्त आहेत, याचा विचार केंद्र सरकारने करावा. सरकारने गेल्या आर्थिक वर्षात लाखो कोटी रुपयांचे कर इंधन आणि घरगुती गॅसच्या किमती वाढवून गोळा केले आहेत. मोदी सरकार कोणत्या प्रकारचे अच्छे दिन आणत आहे? कार्पोरेट उद्योगांना सवलती आणि कर्ज माफी दिली जात आहे. आणि कोट्यवधी बेरोजगार गोरगरिबांच्या खिशातून त्यांची तुटपुंजी कमाई हिरावून घेत आहे, असा आरोप दराडे यांनी केला.
रेशनवर तेल, साखर, डाळी सहित अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत 13 वस्तूचे रास्त दारात वितरण करा. पेट्रोल डिझेल वरील अबकारी कर 27 टक्क्यांनी कमी करा. कार्पोरेट टॅक्स वाढवा,सरकारी दौरे,प्रशासकीय खर्च कमी करा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात गणेश दराडे, अपर्णा दराडे, सतीश नायर, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, अमिन शेख, बाळासाहेब घस्ते, प्रकाश शिवेकर, दिलीप पेटकर, स्वप्निल जेवळे, शेहनाज शेख, सतीश शिंदे, वीरभद्र स्वामी, अनिता शेरकर, ज्योती मुलमुले, रिया सागवेकर, संगीता, देवळे, योगिता कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी आणि महिला, युवक, रिक्षा व्यावसायिक निदर्शनात सामील झाले होते.










Leave a Reply