Lonavala News : पर्यटनाचे आकर्षण, भुशी धरण ओव्हरफ्लो…!
पर्यटकांना मात्र धरणावर जाता येणार नाही
Pckhabar- लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. मात्र यासाठी पोलिसांची मेहेरनजर असणे आवश्यक असणार आहे.
गुरुवारी दिवसभर आणि रात्री देखील मुसळधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी देखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण दोनच दिवसात ओव्हरफ्लो झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
पर्यटनस्थळ बंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या सांडव्यावर जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षी देखील घेता येईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून भुशी धरण पर्यटकांना मुकले आहे. यावर्षी देखील अद्याप पर्यटनस्थळ बंदी कायम असल्याने धरणावर जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून धरणाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर नौसेना बाग याठिकाणी पोलीस पोस्ट लावण्यात आली आहे.










Leave a Reply