Pimpri News : वाहन चोरट्यांचा धुमाकूळ, पाच महिन्यात साडेचारशे वाहने चोरीला!

Pimpri News : वाहन चोरट्यांचा धुमाकूळ, पाच महिन्यात साडेचारशे वाहने चोरीला!

कोरोना, लाॅकडाऊन, वाढती महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला

वाहने चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा संताप
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाहन चोरट्यांना पोलीस पकडण्यात अपयशी ठरत असून सर्वसामान्य नागरिकांची वाहने दररोज चोरीला जात आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल 445 दुचाकी वाहने चोरीला गेली. केवळ 68 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण केवळ 15 टक्के एवढे आहे. अधिच कोरोना, लाॅकडाऊन, वाढती महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आणि दररोज वाहने चोरीच्या घटनांमुळे नागरिक पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

शहरात गुरुवारी तर तब्बल दहा दुचाकी तर एक रिक्षा चोरीचे असे एकूण 11 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये चोरट्यांनी  तीन लाखांची वाहने चोरून नेली आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक दुचाकी चोरट्यांनी थरमॅक्स कंपनीच्या गेट समोरून तर एक दुचाकी आंबेडकर वसाहत निगडी येथून घराच्या पार्किंगमधून चोरून नेली.

चाकण पोलीस ठाण्यात देखील वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात चोरट्यांनी जेबीएम कंपनी समोरून दुचाकी चोरून नेली आहे. तर दुसरी घटना भामचंद्र विद्यालय भांबोली येथे घडली आहे. विद्यालया समोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. चाकणमधील दोन्ही प्रकार भर दिवसा घडले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोन्ही गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत. चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून या दुचाकी चोरून नेल्या आहेत. चिखली पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरी तर एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही दोन्ही वाहने चोरट्यांनी घरासमोरुन चोरून नेली आहेत.

तळेगाव दाभाडे येथे जनरल हॉस्पिटल समोरून दुचाकी चोरून नेली आहे. तर सोमाटणे येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात देखील एक मोपेड दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुचाकी घरासमोरून चोरून नेली आहे.
वाहन चोरटे प्रामुख्याने दुचाकी वाहनांना टार्गेट करत आहेत. मे महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 96 दुचाकी चोरीला गेल्या. त्यातील केवळ 15 दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच चार तीन चाकी वाहने चोरीला गेली. त्यातील दोन वाहने पोलिसांनी शोधली आहेत. मे महिन्यात चार कार चोरीला गेल्या. त्यातील एक कार पोलिसांना मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *