Lonavala Crime News : सुप्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा; 66 लाख 77 हजारांचा ऐवज चोरीला


Lonavala Crime News : सुप्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र
दरोडा; 66 लाख 77 हजारांचा ऐवज चोरीला
डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून गळ्याला लावले धारदार शस्त्र, 12 दरोडेखोरांचा सहभाग
Pckhabar- लोणावळ्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (वय-73) यांच्या प्रधानपार्क मधील बंगल्यावर 11 ते 12 सशस्त्र दरोडेखोरांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून गळ्याला धारदार शस्त्र लावून सुमारे 67 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये सुमारे 50 लाखांची रोकड व 17 लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे. हा प्रकार  गुरुवारी मध्यरात्री एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.  या घटनेमुळे लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री एक ते अडीच वाजण्याच्या दरम्यान 11ते 12 दरोडेखोरांनी डॉक्टर खंडेलवाल यांच्या प्रधान पार्कमधील बंगल्यात प्रवेश करून बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या स्लाइडिंग खिडकीची काच उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर 6 ते 7 जणांनी वयस्कर डॉक्टर खंडेलवाल यांचे व त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून त्यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावले. डॉक्टरांनी  जिवाच्या भीतीने कपाट व लॉकरची चावी दरोडेखोरांच्या स्वाधीन केली. त्यानंतर दरोडेखोरांनी सर्व कपाटे व लॉकर उघडून त्यामधील सुमारे 50 लाखांची रोकड व 17 लाखांचे दागिने असा सुमारे अंदाजे 67 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये काही  हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे. दरोड्यानंतर दरोडेखोरांनी बेडरूममधील चादर पहिल्या मजल्यावरील लोखंडी रेलिंगला बांधून भरलेल्या बॅगा घेऊन खाली उतरून पोबारा केला. सदर घटनेचेदृष्य बंगल्यातील एका सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले आहे.

दरोडेखोर निघून गेल्यानंतर डॉक्टरांनी आलार्मचे बटन दाबून दवाखान्यात असलेल्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला. अलार्मचा आवाज ऐकून कर्मचारी तुषार शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांच्या रूममध्ये जाऊन पाहणी केली असता त्यांना डॉक्टर व त्यांच्या पत्नीला बांधले असल्याचे निदर्शनास आले. तसेच घरात सर्व अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे  बांधलेले हातपाय सोडविले.  तुषार शिंदे यांनी तत्काळ  लोणावळा पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस नवनीत कॉवत व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी‍ व सहकाऱ्यांसह  घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. या घटनेची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत तपासाची दिशा ठरवत, तपासाला  सुरूवात केली आहे. या घटनेचा पुढील लोणावळा शहर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *