Pune News : पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू करा; प्रवासी संघटना, प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
Pckhabar-कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सुमारे सव्वा वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे या दरम्यान प्रवास करणार्या हजारो प्रवाशांना रोजच प्रवासासाठी इतर वाहतूकीचा पर्याय शोधावा लागत आहे. त्यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे. त्यामुळे योग्य ते काळजी घेऊन अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करा, अशी मागणी प्रवासी संघटनांसह प्रवासी करीत आहेत.
पुणे-लोणावळा मार्गावर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठीच लोकल सेवा सुरू आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन फेर्या होत आहेत. त्यातुन सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. इतर वेळी मात्र दिवसभरात लोकलने सुमारे एक ते सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असल्याने त्या सर्वांना इतर वाहनांचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र तिकीटासाठी लोकलपेक्षा इतर वाहनांना अधिकचे पैसो मोजावे लागत असल्याने लोकलचे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्या विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यावसायिकांची संख्या लक्षणीय आहे. निर्बंध शिथील झाल्याने यातील विद्यार्थी वगळता इतर सर्वच घटकांची रोज ये-जा सुरू झाली आहे. मात्र सद्य:स्थितीत लोकलने डॉक्टर, रूग्णालयातील कर्मचारी, वकील, पोलिस, रूग्णवाहिका चालक, एसटी, पीएमपीचे कर्मचारी, वैद्यकीय प्रयोगशाळा, रक्तपेढ्यांतील कर्मचारी, शासकीय सेवेतील नोकरदार आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच लोकलचा प्रवास करता येतो. कोरोनामुळे बहुतेकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे लोकलचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणे नितांत गरजेचे असल्याची मागणी प्रवासी करत आहेत.










Leave a Reply