Pimpri News: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंटरनेटसाठी रोख अनुदान द्या
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाची मागणी
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेल्या दिड वर्षांपासून देशात सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच येत्या 14 जूनपासून राज्यातील सर्व शाळा ऑनलाइन सुरू होणार आहेत. त्यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिका शाळेत ऑनलाइन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मासिक इंटरनेट रिचार्जसाठी रोख अनुदान देण्याची मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) ने केली आहे.
याबाबत डीवायएफआयने महापौर उषा ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. महापौर आणि आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे गेल्या दिड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या शाळांमध्ये हजारो गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक गोर-गरीब घरेलू कामगार, विधवा, अपंग, रिक्षाचालक आणि रोजंदारी नागरिकांना घरभाडे भरणे जड जात आहे. या नागरिकांचे रोजगार, छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या दिड हजार रूपयांची तुटपुंजी मदत, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्यांना करता येत नाही.
तसेच देशात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा इशारा तज्ञांनी दिला आहे. 14 जूनपासून ऑनलाइन पध्दतीनेच शाळा सुरू होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून महापालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेणार्यासाठी किमान 2 जीबी दरदिवसाचा इंटरनेट डेटा कॉलसह 500 रु अनुदान तीन महिन्यासाठी द्यावा, अशी मागणी डीवायएफआयचे अमिन शेख, स्वप्निल जेवळे, सचिन देसा, पावसु कर्हे, गौरव पानवलकर, अमोल जगताप आदींनी केली आहे.









Leave a Reply