Pimpri News: ‘गोरगरिबांना मदतीचे गाजर दाखवून भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न’
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची घणाघाती टीका
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने कायद्यातील तरतुदींचा अभ्यास न करता तसेच कोणतेही नियोजन न करता शहरातील गरिबांना तीन हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात ही मदत देता येते किंवा नाही त्याचा कोणताही अभ्यास केला नव्हता. केवळ गोरगरिबांना मदतीचे गाजर दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
सत्ताधारी भाजपने चालवला आहे. ही मदत देता येत नाही असे लक्षात आल्यानंतर त्याचे खापर महापालिका आयुक्तांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गरिबांना दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील गरिबांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात या घोषणेने व्यतिरिक्त यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. बुधवारी महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सदस्य आणि काही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचे खापर आयुक्तांच्या डोक्यावर पडण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाला आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी उशीरा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या वतीने महापालिकेचे प्रवक्ता शिरीष कोरड यांनी प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांकडे लिखित स्वरूपात खुलासा पाठविला असून महापालिका अधिनियमाअंतर्गत थेट स्वरूपात आर्थिक मदत देण्याची तरतूद नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना 3 हजार रुपयांची मदत देण्याबाबत महापालिका अंमलबजावणी करू शकत नाही असा खुलासा केला आहे.
याबाबत बोलताना कलाटे म्हणाले, ”महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून केवळ चमकोगिरी करण्यासाठी ठराव करून गरिबाच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. कोणतीही कायदेशीर तरतूद न पाहता, नियोजन न करता, योजना तयार न करता महासभा आणि स्थायी समितीची मान्यता मिळविण्यापूर्वी घोषणा केली. त्यानंतर ठराव करण्यात आला. गरिबांना मदत देण्याचा विषय चांगला होता. पण, कायदा न पाहता घोषणाबाजी करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि आयुक्तांना बदनाम करणे योग्य नाही. भाजपकडून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे”.









Leave a Reply