Chinchwad Crime News: मोटार भाड्याने देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

Chinchwad Crime News: मोटार भाड्याने देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड
1 कोटी 20 लाखांच्या 16 मोटारी जप्त
Pckhabar- मोटार भाड्याने देण्याचे अमिष दाखवून मालकांबरोबर करारकरून मोटार घेऊन मालकाच्या परस्पर मोटारी विकून पैसे उकळणार्‍या एका टोळीचा चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहा आरोपींना अटक करून 1 कोटी 20 लाखांच्या 16 महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
कल्पेश अनिल पंगेकर (वय-33, रा. नवी खडकी), नमन सहाणी (वय-39, रा. लोहगाव) हे दोघे मुख्य आरोपी आहेत. सनी भाऊसाहेब कांबळे (वय-27, रा. खडकी), संदिप ज्ञानेश्वर गुंजाळ (वय-37, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), हितेश ईश्वर चंडालिया (वय-27, रा. जय जवाननगर, येरवडा), रोनित मधुकर कदम (वय-28, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौ. सोसायटी, येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल नामदेव राखपसरे (रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राखपसरे यांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीमार्फत आरोपी नमन सहाणी आणि कल्पेश पंगेकर यांची ओळख झाली होती. आरोपींनी राखपसरे यांना मोटार भाड्याने देण्याचे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडलेल्या राखपसरे यांनी इरटिगा मोटार (एमएच-14, जे एच 2375) करार करून चार महिन्यांपुर्वी घेऊन गेले. मात्र, या मोटारीचे ना भाडे दिले ना त्यांना त्यांची मोटार दाखविली. याबाबत आरोपी सहाणी, पंगेकर यांना विचारल्यानंतर फिर्यादी यांना धमकी देऊन मारहाण, शिवीगाळ केली. राखपसरे यांनी त्वरीत चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरूध्द तक्रार दिली. मुख्य आरोपी सहानी, पंगेकर हे दर पंधरा दिवसांनी घर बदलून राहत होते. त्यामुळे पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हते. अखेर चिंचवड पोलिसांनी मुख्य आरोपी सहानी, पंगेकर यांना अटक केली.

आरोपींनी पोलीस तपासात असे 15 गुन्हे केल्याचे कबूल केले. उर्वरित चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
या सर्व आरोपींकडून इरटिगा, स्विफ्ट डिझायर, मारूती ब्रिझा, होंडा सिटी, हुंडाई असेंट अशा 1 कोटी 20 लाख 20 हजार रूपयांच्या 16 महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *