Article By Dr. Ankush Jadhav : त्रयोदशगुणी अर्थात पानाचा विडा
Pckhabar- भारतीय हिंदु संस्कृतीत कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यात नागवेलीच्या पानाला अनन्य साधारण महत्व आहे. धार्मिक व सामाजिक कार्याबरोबरच हे पान आरोग्य वाढविण्यात व रोग निवरणात ही महत्वाची भूमिका निभावते.
नागवेलीच्या पानाला संस्कृत मध्ये नागवेल, नागवल्ली, तांबूल इ अनेक नावे असली तरी याचे विड्याचे वा खाण्याचे पान ही नावे जास्त प्रसिध्द आहेत.
पानाच्या बंगाली पान, देशी पान, कलकत्ता पान इ. विविध प्रकार असून व्यवहारात खाण्यासाठी बनारसी, मसाला, पलंगतोड, इ. अनेक प्रकारची पाने मिळतात.
विडा ज्या कारणासाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत. कोणतीही अवघड कामगिरी स्वीकारण्याचे आव्हान स्वीकारणे म्हणजे पानाचा विडा उचलणे. बाळंतपणात बाळंतणीला दिला जाणारा बाळंत विडा, पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा, प्रणयाराधनेसाठी दिला जाणारा प्रियसीचा विडा, जेवणा नंतर खाल्ला जाणारा आयुर्वेदात सांगितलेला त्रयोदशगुणी विडा म्हणजेच गुणवंत विडा. या प्रत्येक विड्याचे गुण वेगवेगळे आहेत.
विड्याच्या अर्थात नागवेलीच्या पानातील रासायनिक तत्वे. यात साधारण पिवळ्या रंगाचे तीक्ष्ण वातनाशक, काहीसे दाहकारक असे उदानशील तेल ४%असते. या तेलात सेसाक्विंटरपीन व केडेनिन हे घटक असतात. हे कार्बोलिक असिड पेक्षा ५ पट अधिक निर्जंतुक आहेत. पानात ३.१%प्रथिने,६.१% पिष्टमय पदार्थ,२.३%खनिज पदार्थ (कॉपर, झिंक इ.) असतात. काही प्रमाणात ए.सी.ई. ही अँटीऑक्सिडंट जीवनसत्त्वे , जी फ्री राडीकल(Radical) विरुद्ध सामना करून आपले तारुण्य टिकविण्याचे काम करतात . केरोटीन व क्लोरोफिल असतात. क्लोरोफिल दातांसाठी चांगले असते. सर्व पानामध्ये पियोरीन, पियोडिरीन, इरेकोलील, मर्क्युरिक असे विषारी घटक अल्प प्रमाणात असतात. चुना, सुपारी, कात यामुळे हे विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. हे विषारी घटक पानाच्या टोकात व देठात जास्त प्रमाणात असतात. म्हणूनच पानाच्या टोकाचा भाग व देठ काढून पान खातात.
पानाचे गुणधर्म
पान रसाने तिखट (कटू), कडू, उष्ण, काहीसे पित्त वाढविणारे, वात शामक,
अपक्व अन्नाचे पचन करणारे, अनुलोमक, कृमीं नाशक, मुखदुर्गंध नाशक, कांती वाढविणारे, पौष्टिक व वेदनाशामक आहे.
आयुर्वेदानुसार त्रयोदशगुणी विडा व त्याचे घटक
नागवेली चे पान, चुना,सुपारी,कात, केशर, भीमसेनी कापूर, कंकोल,
जायफळ,जायपत्री, लवंग, बदाम, वेलची, कस्तुरी. सध्या यातील कस्तुरी फारसी वापरत नाहीत.
तांबुलाचे तेरा गुण
तिखट, कडू, उष्ण, मधुर, क्षार, कफ नाशक, वात नाशक, कृमीं नाशक, दुर्गंध (विशेषतः मुखाची) नाशक,स्त्री-संभाषण भूषण, स्थैर्यकर व काम शक्ती वाढविणारे.
पानविडा मुखाचे आरोग्य कायम राखणारा, मुखाच्या आजारांचे निवारण करणारा, कामेच्छा वाढविणारा, भोजनोत्तर
मनाला भोजनाचे समाधान मिळवून देणारा, खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत करणारा, दात व पोटातील जंत (कृमीं) नष्ट करणारा, पोटात निर्माण होणाऱ्या वायू ला (आजच्या भाषेत -गॅसेस) बाहेर घालविणारा आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, क्रोमियन इ. घटक यात असल्याने हाडांची मजबुती व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेदना असल्यास त्या कमी करतो, भूक वाढवितो. श्वास, खोकला, फुफ्फुसाचे अन्य आजार यावर उपयोगी आहे. मनात हर्ष उत्पन्न करणारा असल्याने हृदय दौर्बल्य व अन्य हृदय रोगात उपयोगी आहे. आवाज बसने, घर घर होने यावर उपयोगी.
पानाच्या विड्याचे पचनसंस्थे पासूनच्या तोंडापासून, पचनानंतर च्या प्रजनन संस्थेपर्यंत अनेक लाभ, फायदे होतात. सामान्यतः विड्यात पान, सुपारी, चुना, कात, वेलची, लवंग यांचा समावेश असतो. सध्या पानट्टीवर मिळणाऱ्या मसाला पानात वरील घटक व गुलकंद, बडीशेप, खोबरे,चेरी,
गुलाब जल, धान्याची डाळ, ज्येष्ठमध इ.चा समावेश असतो.
हे सर्वच घटक शरीर व मनासाठी चांगले असून काही मुख, नाक, फुफ्फुस, मन यांचे सामान्य आजार बरे करणारे व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आहेत.
तंबाखू घालून कधी ही पान खाऊ नये. गुटखा मिसळून पान खाऊ नये.हे शरीरासाठी घातक आहे. जास्त प्रमाणात चुना वापरल्यास तोंड भाजते म्हणून चुना व सुपारीचा योग्य प्रमाणात वापर करावा.
सामान्यतः जेवणानंतर मुखशुद्धी,पचनासाठी पानविडा वा मसाला पान अवश्य खावे.
वारंवार पान खाने सुद्धा चांगले नाही. ते उपकारक न होता अपकारक होईल.
काही ठिकाणी पाना विषयी गैरसमज आहेत. पान शरीरासाठी अपायकारक नसून उपकारक आहे. त्याचा उपयोग अवश्य करावा.
सध्या कोरोना, म्युकर मायकोसिस इ.आजारांसाठी प्रतिबंधक उपाय व कोरोना होऊन गेल्यानंतर जे दुष्परिणाम दिसून येतात. त्यांनी पान खाण्यास काहीच हरकत नाही, फायदाच होईल.
डॉ. अंकुश जाधव










Leave a Reply