Pimpri news: शहरातील स्वस्त धान्य दुकानांवर परिमंडळ कार्यालयाच्या धाडी
कोरोना काळात जोखीम पत्करणाऱ्या दुकानदारांप्रती अविश्वास – विजय गुप्ता
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय अंत्योदय योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. माहे मे व जून या दोन्ही महिन्याचे मोफत धान्य वाटप सुरु आहे. दरम्यान काही स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य वाटपात दुजाभाव करीत असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड ‘अ व ज’ शिधावाटप परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी तथा नायब तहसिलदार दिनेश तावरे यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या.
त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक तुषार नावडकर, रविकुमार शेटे, हेमंत भोकरे, अनिता शिनगारे, स्नेहल गायकवाड, दक्षता समिती सदस्या वैभवी घोडके, संजय धुतडमल, नुर रसूल खान, राजेंद्र कर्नावट यांच्या पथकाने त्यांच्या अखत्यारीतील बिजलीनगर, दळवीनगर, मोरेवस्ती, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, आकुर्डी येथील स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या व पाहणी केली व धान्यवाटपाचा आढावा घेतला.
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात ‘ऑनलाइन’ कार्डधारकांना अन्नधान्य वितरण व्यवस्थित होत आहे की नाही, किती लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले, याची माहिती घेतली. दरम्यान प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ तसेच नियमित कोट्यानुसार दरमहा दिले जाणारे धान्य मोफत वाटप केले जात आहे. रेशन कार्ड धारकांना त्यांचे हक्काचे मिळणारे धान्य सुरळीतपणे वितरित होत असून, त्यामध्ये दुकानदारांकडून कोणतीही गफलत होत नसल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला आहे.
”धान्य वाटपात कोणत्याही लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्यास शासनाच्या स्वस्त धान्य कार्यालयात तक्रार दाखल करावी. जातीने त्याची शाहनिशा करून, दोषी दुकानदारांवर कायदेशीरपणे कारवाई केली जाईल.”
मा. दिनेश तावरे (‘अ व ज’ शिधावाटप परिमंडळ अधिकारी तथा नायब तहसिलदार)
”लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब नागरिक, कामगार, परजिल्ह्यातून शहरात नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाकडून रेशनिंग दुकानामार्फत प्रति व्यक्ती मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही लाभार्थांना रेशन दुकानदारांकडून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, परिमंडळ अधिकारी, दक्षता समिती व पुरवठा अधिकाऱ्यांनी शहरातील काही दुकानांना भेटी दिल्याच्या बातम्या वर्तमानपत्राद्वारे समजल्या. मुळात सर्व ऑनलाईन कार्डधारकांना व इतर लाभार्थांना स्वस्त धान्य दुकानांकडून कोरोनाची जोखीम पत्करून शासनाचे धान्य सुरळीतपणे दिले जात आहे. धान्य डावलले जात असल्याचा अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाही. काही सामजिक संघटनांकडून स्वार्थापोटी लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी परिमंडळ कार्यालयाकडे मुद्दामून केल्या आहेत. त्याला कोणताही आधार नाही. धान्य वाटपात कोणत्याही लाभार्थ्यांवर अन्याय होत असेल तर, त्यांनी खुशाल स्वस्त धान्य कार्यालयात जाऊन दुकानदारांविरोधात तक्रार करावी. आमची संघटना त्या लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करील.”
– मा. विजय गुप्ता (खजिनदार, ऑल इंडिया फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशन)










Leave a Reply