Bhosari news: आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यास पालिकेची अक्षम्य दिरंगाई : अजित गव्हाणे
Pckhabar- राज्य सरकारने दहा वर्षांपूर्वी आंद्रा, भामा आसखेड धरणातून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पाणी आरक्षणास एकाचवेळी मंजुरी दिली. पुणे महापालिका पाणी मिळविण्यात यशस्वी ठरली. पुणे महापालिकेने खेडवरुन पाणी उचलले. पिंपरी-चिंचवड शहराला ओलांडून पुणेकरांना पाणी दिले. पण, पिंपरी पालिका अक्षम्य दिरंगाईमुळे पाणी आणण्यात अपयशी ठरली. पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने तत्काळ पाणी पुरवठ्याच्या कामाला गती द्यावी. अन्यथा आठ महिन्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांनी दिला. भूसंपादनाचा निधी दुसरीकडे वळविल्याने आता पाण्यासाठी जागेचे भूसंपादन करण्याकरितासुद्धा निधी नसल्याने गव्हाणे यांनी खंत व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेची गुरुवारी ऑनलाइन सर्वसाधारण सभा झाली. या सभेत बोलताना नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग, भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन राज्य सरकारने आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी असे एकूण 267 एमएलडी पाणी कोटा शहरासाठी सन 2011 मध्ये आरक्षित केला. त्याची मुदत संपल्याने 2018 मध्ये पुन्हा कोटा आरक्षित केला. पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या पाणी आरक्षण कोट्याला एकाचवेळी मान्यता मिळाली होती. पुणे महापालिका खेडवरून पाणी उचलत पिंपरी-चिंचवडला ओलांडून पुणेकरांना पाणी देण्यात यशस्वी झाली. पण, 2021 उजाडले तरी पिंपरी महापालिका शहरासाठी पाणी आणू शकली नाही. त्याकामी मोठी दिरंगाई झाली. पाणीपुरवठयासारख्या महत्वाच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. आंद्रा-भामातून नवलाख उंब्रे येथे पाणी आणले जाणार आहे. तेथून पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पाईपलाईनमध्ये पाणी आणण्याचे ठरले होते. त्यानुसार काम करावे. कामाला गती देणे आवश्यक आहे. पवना बंद जलवाहिनीसारखी त्याची परिस्थिती होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
तळवडेत जॅकवेलचे काम सुरू करायचे आहे. त्यासाठीच्या जागेच्या भूसंपादन करण्याकरिता निधी नाही. भूसंपादनाठी अंदाजपत्रकात 150 कोटीचा निधी ठेवला होता. त्यातील 110 कोटी स्थायी समितीसाठी आणि 38 कोटी महासभेकडे वळविले. हे अत्यंत गंभीर आहे. फक्त दोन कोटी रुपयांचा निधी भूसंपदानासाठी ठेवला आहे. नगररचना विभागाकडे रक्कम नाही. त्यामुळे भूसंपादन करण्यात अडचण येत आहे. हे अतिशय चुकीचे असून निधी अभावी पाण्याचे महत्वाचे काम लांबणीवर जाण्याची भीती आहे.
शहरातील पाणी प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शहरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
कोरोनामुळे अनेक नागरिक आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे सध्या पाणी टंचाई जाणवत नाही. पंरतु, पुढील सात ते आठ महिन्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्तापासून पाण्याच्या विषयात खोलात जाऊन अभ्यास करावा. पाणी पुरवठ्याच्या कामाला गती द्यावी अशी सूचना नगरसेवक गव्हाणे यांनी केली.










Leave a Reply