Dehu News : अर्धवट सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करा; अभंग प्रतिष्ठानची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Pckhabar- तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील अनेक कामे अर्धवट आहेत. हा प्रकल्प होऊनही अनेक ठिकाणी सांडपाणी, अशुद्ध पाणी पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये जात आहे. त्यामुळे हा अर्धवट सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी
अभंग प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
अभंग प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत देहूगावात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील अनेक कामे अर्धवट आहेत. हा प्रकल्प होऊनही अनेक ठिकाणी सांडपाणी, अशुद्ध पाणी पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये जात आहे. या प्रकल्पासाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. लाखो रूपयांचा खर्च करूनही नदीत थेट अशुद्ध पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हा खर्च पाण्यात गेला आहे. यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.
देहूगाव हे श्री संत तुकाराम महाराज यांची भूमी असल्याने राज्यासह देशभरातून लाखो वारकरी देहूत येत असतात. वारकरी मोठ्या श्रध्देने पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र, अशुद्ध पाणी थेट नदीत सोडल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अर्धवट सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प त्वरित पूर्ण त्वरित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे, माजी उपसरपंच सचिन कुंभार, सागर भसे व प्रा. विकास कंद यांनी केली आहे.










Leave a Reply