Pimpri news: महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत खासगी रुग्णालयाला 48 व्हेंटिलेटर दिले : चौकशी करण्याची आमदार जगताप यांची मागणी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेला सीएसआर अंर्तगत
मिळालेले 48 व्हेंटिलेटर वैद्यकीय विभागाने 10 खासगी रुग्णालयाला नियमबाह्यपणे वाटले. शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता व्हेंटिलेटरची नित्यंत गरज आहे. व्हेंटिलेटर नियमबाह्यरित्या खासगी रुग्णालयाशी आर्थिक हितसंबंध जोपासत दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.
याबाबत आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.
आमदार जगताप यांनी पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रतिबंध करून वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या वायसीएम, ऑटो क्लस्टर, भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, जम्बो कोविड रुग्णालयात अनेक आर्थिक दुर्बल घटकातील गरीब रुग्ण एकीकडे पैशाअभावी महागड्या खासगी रुग्णालयात औषधोपचार करण्याची परिस्थिती नसल्याने ऑक्सिजन बेड, व्हॅटीलेटर बेड व वैद्यकीय उपाचाराकरिता प्रतीक्षेत होते.
महापालिकेच्या रुग्णालयातून व्हेंटिलेटरअभावी अनेक नागरिकांनी आपल्या रुग्णाला नाईलाजास्तव आर्थिक भार सोसून खासगी महागड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यामुळे शहरातील काही कंपन्यांनी सीएसआर फंडातून महापालिकेला व्हेंटिलेटर दिले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वतःच्या रुग्णालयातील व्हेंटिलेटरची क्षमता वाढविणे गरजेचे होते. मात्र, महापालिका क्षेत्रातील 10 खासगी रुग्णालयांना नियमबाह्यरित्या 48 व्हेंटिलेटर वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयांना व्हेंटिलेटर वाटप करताना गरीब रुग्णांना सवलत देण्याबाबत कोणतेही नियम व अटी लावण्यात आल्या नाहीत. परिणामी, गरीब रुग्णांना या खासगी रुग्णालयात कोणतीही सवलत न मिळता खासगी रुग्णालयांच्या वाढीव दरानुसार वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाला वाटप केलेल्या 48 व्हेंटिलेटर वाटप प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. तसेच वाटप केलेले सर्व व्हेंटिलेटर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता रुग्णालयात तातडीने उपचाराकरिता उपलब्ध करून घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.
या खासगी रुग्णालयांना दिले व्हेंटिलेटर
डॉ.डी.वाय.पाटील -10
लोकमान्य हॉस्पिटल- 5
(निगडी)
लोकमान्य हॉस्पिटल
(चिंचवड) -3
स्टार हॉस्पिटल
(आकुर्डी) -5
आदित्य बिर्ला -5
अकॉर्ड हॉस्पिटल
(भोसरी) -4
निरामय हॉस्पिटल
(चिंचवड) – 5
ब्रम्हचैतन्य हॉस्पिटल -5
स्टर्लिंग हॉस्पिटल
(आकुर्डी) -4
ओजस हॉस्पिटल – 2
(रावेत)
असे एकूण 48 व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना दिले आहेत.










Leave a Reply