EDITORIAL: पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा पॅटर्नच वेगळा; चार महिन्यात तीन अधिकारी निलंबित!

 

EDITORIAL: पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा पॅटर्नच वेगळा; चार महिन्यात तीन अधिकारी निलंबित!

Pckhabar- पिंपरी-चिंचवड  पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. कृष्णप्रकाश यांनी शहरात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. खाबुगिरी करणाऱ्या, गुन्हेगारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे. अवघ्या चार महिन्याच्या कार्यकाळात आयुक्तांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दुचाकीस्वार महिलेकडून पैसे घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेला निलंबित केले आहे. आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या या निर्णयामुळे ‘चुकीला माफी नाही’ असेच म्हणावे लागेल.

तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या बदली नंतर कृष्णप्रकाश यांनी 5 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारताच शहरातील व्हाईट काॅलर गुन्हेगारासह इतर गुन्हेगारांना आपल्या काळात गुन्हेगारी खपवून घेणार नसल्याचा गर्भित इशारा दिला. कोणीही चुकीचे काम केले तर त्याची गय केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.

आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गेल्या अनेक वर्षापासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडलेल्या आणि वर्चस्व ठेवून प्रस्थापित झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक केली. त्यानंतर त्याच आणखी एका प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून नियमबाह्यपणे महिलेला अटक केल्याचे चौकशीत समोर आले आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांचे निलंबन केले.

पिंपरीत दुचाकीस्वार महिलेवर कारवाई टाळण्यासाठी अनोखा पध्दतीने पैसे स्वीकारणाऱ्या महिला पोलीस हवालदार स्वाती सोन्नर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याप्रकरणाची त्वरित दखल घेत सोन्नर यांचेही निलंबन करण्यात आले.

गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका ठेवत पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे)  राजेंद्र निकाळजे आणि उपनिरीक्षक एस. एस. जाधव यांचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबनाचे आदेश काढले. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

राजेंद्र निकाळजे यांनी एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करण्याबाबत न्यायालयाकडे लेखी अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. तसेच, उपनिरीक्षक जाधव यांनी देखील आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करण्याबाबत न्यायालयाकडे लेखी अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणातही आरोपींना जामीन मंजूर केला. पोलीस निरीक्षक निकाळजे आणि उपनिरीक्षक जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत  केली असा, ठपका ठेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या या धडक कारवाईमुळे पोलीस दलात काही प्रमाणात तरी शिस्त येईल. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देतील, अशी आशा करण्यास हरकत नाही. शहरात अद्यापही काही प्रमाणात सुरू असलेले अवैध धंद्यावर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दुचाकी चोरी नियंत्रण आणण्यात अपयश

औद्योगिक नगरी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कामाच्या, व्यवसायाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांचा शहराकडे ओढा आहे. मात्र, याच कामगार, सर्वसामान्य नागरिकांसह आदींच्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरातील विविध भागात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुचाकी चोरी नियंत्रणात आणण्यामध्ये पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी दुचाकी चोरट्यांवर जरब बसविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

                            संपादक
                         Pckhabar. Com

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *