Pimpri news: भटक्या गायींचा महापालिका करणार सांभाळ
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दुध न देणार्या भाकड गायी, अपंग आणि आजारी असणार्या गायी तसेच जनावरांचा विशेषत्वाने सांभाळ करून त्यांना योग्य आहार पुरविण्यात येणार आहे. यासाठी येणार्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आली. स्वतंत्र संस्थांना ही जबाबदारी देण्यात येणार आहे. तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणार्या एकूण सुमारे 179 कोटी 24 लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची बैठक पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. प्रभाग क्रमांक 8 मध्ये ठिकठिकाणी फुटपाथ, दुभाजक आणि रस्ता सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी 7 कोटी 89 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 2 सेक्टर नं. 16 मध्ये राजे शिवाजीनगर मधील रस्ते अद्ययावत पध्दतीने करण्यासाठी 27 कोटी 94 लाख रुपये, पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे आवशक्यतेनुसार सुशोभिकरण करण्यासाठी 62 लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
उद्यान विभागाकडील ब व ग क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. 22 व 23 मधील विविध उद्याने देखभाल व संरक्षण करण्यासाठी 54 लाख रुपये खर्च होणार आहेत. पालिकेच्या रावेत ग्रॅव्हिटी व मामुर्डी पंपींगसाठी गुरूत्व वाहिनीचे देखभाल दुरूस्ती करण्यासाठी 17 लाख रुपये खर्च होणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडील विविध ठिकाणच्या पंप हाऊसचे चालन करण्याकामी खर्च होणार आहे. यामध्ये थेरगाव गावठाण, सर्वे नं. 9 थेरगाव, लक्ष्मणनगर, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टर आणि पुनावळेसाठी 1 कोटी 36 लाख रुपये, सांगवी गावठाण, सांगवी पीडब्लूडी, सांगवी सर्वे नं. 84, पिंपळे गुरव दापोडीसाठी 1 कोटी 35 लाख रुपये, रहाटणी, सर्वे नं. 96, लांडेवाडी, दिघी, चर्होली, आणि बोपखेलसाठी 1 कोटी 47 लाख रुपये आणि कृष्णानगर, सर्वे नं. 22 पाटीलनगर, जाधववाडी, सेक्टर 10 आणि गवळीमाथ्यासाठी 1 कोटी 56 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.










Leave a Reply