Article: येवले दाम्पत्यांची लायनिझमची दोन तपे..! ‘सामाजिक बांधिलकीची जाण व आत्मसमाधान’

Article: येवले दाम्पत्यांची लायनिझमची दोन तपे..! ‘सामाजिक बांधिलकीची जाण व आत्मसमाधान’

Pckhabar-  समाजासाठी काही तरी चांगले करण्याचे ध्येय ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत एम जे एफ लायन अशोक येवले आणि त्यांच्या पत्नी लायन उषा येवले हे दाम्पत्य दोन तपापेक्षा अधिक कार्यरत आहे. त्यांचा  लायनिझमच्या दोन तपाच्या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभव येवले दाम्पत्याला आले. मात्र, त्यांनी समाजाप्रती आपली निष्ठा, बांधिलकी ढळू न देता दोन तपाहून अधिक कार्यरत आहेत!  एम जे एफ लायन अशोक येवले आणि  लायन उषा येवले यांनी शब्दबद्ध केलेला प्रवास…

लायन वर्ष 1998 मध्ये आम्ही लायनीझमची दीक्षा घेतली .आमचे जेष्ठ लायन शांतिलालजी दुगड यांनी लायन्स क्लबची माहिती, लायन्सचे  कर्तव्य , विविध सामाजिक उपक्रम याची सविस्तर कल्पना दिली व आम्ही आनंदाने  ती स्वीकारली. नियमाप्रमाणे तीन मीटिंगमध्ये सहभागी झालो. त्यावेळी protocol अतिशय गांभीर्याने पाळला जात असे .
जेष्ठ लायन अशोक शाळू , लायन बी आर कर्नावट , लायन हरी नायर, लायन कांतीलाल मुनोत , लायन जयंत व जयश्री मांडे  यांनी माझी  लायन्स सभासद होण्यामागची  भूमिका जाणून घेतली आणि मला क्लबमध्ये आनंदाने सामावून घेतले. जेष्ठ लायन्सनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व समाजकार्यासाठी प्रेरित केले. मनापासून स्वीकारलेल्या सेवाकार्यामुळेच गेली 22 वर्षे क्रियाशील सभासद आहोत. आणि म्हणूनच लायन्सचे सभासदत्व देतांना विचारपूर्वक निर्णय घेणे किती आवश्यक आहे त्याची जाणीव असावी म्हणून सगळे सांगणे मला गरजेचे वाटले.

क्लबच्या कामातील उत्स्फूर्त सहभागामुळे मला लायन शामलाताई सोनवणे आणि लायन जयश्रीताई मांडे यांच्या अध्यक्षीय वर्षात खजिनदार होण्याची संधी मिळाली. सगळ्या प्रकारचे अनुभव मिळाले.अनेकांनी आपुलकीने घरात बोलावून प्रेमाने चौकशी केली तर मोजक्यांनी दारातून घालवून दिले. खूप वाईटही वाटले व रागही आला. जेष्ठांची भूमिका यावेळी महत्वाची ठरली .
“समाजसेवेचे व्रत घ्यायचे असेल तर मानापेक्षा अपमान पचवायला शिका ” या मंत्राने माझ्या विचारांची दिशा बदलली .

त्यानंतर 2002-03मध्ये अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. वर्षभराचे मीटिंग आणि सेवाकार्याचे कॅलेंडर आधीच तयार केले होते. शैक्षणिक कार्यावर अधिक भर दिला होता. सगळ्या भावी अध्यक्षांशी चर्चा केली. बहुमोल सूचना मिळाल्या . ” तोंडात साखर आणि मस्तकी बर्फाचा खडा ” हा मंत्र अध्यक्षाने पाळला तर वर्ष आनंदाने निघून जाईल या बहुमोल सूचनेचा खरोखर फायदा झाला.
शैक्षणिक क्षेत्रातील भरघोस कार्याबद्दल प्रांताची rotating ट्रॉफी मिळाली. संपूर्ण कुटुंब पाठीशी उभे राहिले आणि वर्ष बघता बघता संपले. Scarp  बुकची पाने चाळली तर सर्व घटना पुन्हा जिवंत होतात.

अध्यक्षीय कारकिर्दीत साधारण 20 शाळांशी फार जवळकीचे संबंध निर्माण झाले. जागृती अंधमुलींची शाळा , कामायनी , बधिर मूक विद्यालय, ब्रह्मदत्त विद्यालय, चिंतामणी रात्र प्रशाला, महर्षी कर्वे विद्यालय या त्यातील काही .पुढील अनेक वर्ष  त्या संस्थांशी वेगवेगळ्या कारणांनी दृढ संबंध प्रस्थापित होत गेले. जागृती शाळा येवलेंची शाळा असे क्लबमध्ये संबोधले जाते. गेल्या 18 वर्षात 3 ऑक्टोबर कधी चुकला नाही. त्यादिवशी मुली बाईना विचारतात “प्रज्ञा ,सर व मॅडम कधी येणार “.
ही आपुलकी आणि प्रेम मन भारावून टाकते. सलग तीन वर्ष विवेकानंद विद्या मंदिर येथील 25 मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. आपणास शिक्षण घेता येईल हा मुलींचा आनंद बघतांना, जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान शब्दापलीकडचे  आहे .

नोकरीतील कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे क्लबच्या सेवाकार्य व मिटींग्स मधील सहभाग काही काळ थंडावला. ला  संजय निंबाळकर अध्यक्ष असतांना पुन्हा क्लबमध्ये सक्रिय होता आले. आपल्या ज्ञानाचा  विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने लायन उषा येवले यांनी प्रेरणा कौशल्य विकास संस्थेची स्थापना केली. बघता बघता 25 समविचारी सभासद एकत्र आले .विविध विषयांचे तज्ञ एकत्र आल्यामुळे हा एकजीव संघ तयार झाला. एकदिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा , वनवासी व आदिवासी  आश्रमशाळा, रात्रप्रशाळा, आय टी आय, डिप्लोमा कॉलेजेस  याठिकाणी   विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील वस्तूंच्या माध्यमातून गणिताची ओळख, इंग्रजीतून संवाद साधण्याची कला, घरगुती व औद्योगिक इलेक्ट्रिकल फिटींग , वाहनांची माहिती, वाहतुकीचे नियम , फोटोग्राफी, सुतारकाम , प्लम्बिंग, मशीनची माहिती असे विविध उपक्रम राबविता आले.

विद्यार्थ्यांचे समाधान व सर तुम्ही पुन्हा आमच्या शाळेत या, हे ऐकणे म्हणजे समाधानाचा परमोच्च बिंदू . यापेक्षा कोणताही पुरस्कार मोठा असू शकत नाही ही आमची धारणा.

लायन्स क्लब हे समाजापर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे. सेवाकार्याची कमी नाही पण आवश्यकतेनुसार राबविलेल्या कार्यामुळे आपल्याला समाधानाची पावती मिळते हे निश्चित! लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्ष व प्रशासकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल क्लबचे नाव प्रांतात आदराने घेतले जाते. या क्लबचे सभासद असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

जय हिंद!
जय लायनीझम!!

एम जे एफ लायन अशोक व लायन उषा येवले

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *