Pimpri news: कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिकेची टास्क फोर्स

Pimpri news: कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिकेची टास्क फोर्स
Pckhabar- कोरोनावरील लस निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु असून काही आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेने टास्क फोर्स समिती गठित केली आहे. लसीकरणात कोविड योद्ध्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांना अगोदर लस टोचविण्यात येणार आहे. शहरातील शासकिय व खाजगी संस्थामधील 12 हजार 222 आरोग्य सेवा कर्मचा-यांची यादी तयार केली आहे.

कोरोनाच्या लस निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काही आठवड्यात लस बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड 19 लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यांची माहिती अहवाल (डाटाबेस) संकलन करण्याचे काम सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत आगामी कोविड 19 लसीकरण नियोजनासाठी पालिका स्तरीय लसीकरण टास्क फोर्स समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक शुक्रवारी (दि.4) अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकिस अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, , सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सर्व्हेलन्स मेडीकल ऑफिसर (डब्ल्युएचओ) डॉ. चेतन खाडे, डॉ.वर्षा डांगे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चैताली इंगळे, शहर कार्यक्रम अधिकारी (आयसीडीएस) सुनंदा धस, निमाचे अध्यक्ष डॉ.सत्यजीत पाटील, सचिव डॉ.अभय तांबिले, निमा, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. विजय सातव हे उपस्थित होते.

लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकिय व खासगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी,वार्डबॉय, वार्डआया, सफाई कामगार, लॅब टेक्निशियन, सोनोग्राफी टेक्निशियन, रुग्णालयातील वाहनचालक, स्वागतिका व कार्यालयातील कर्मचारी यांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शासकिय व खासगी संस्थामधील 12,222 आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती वैद्यकिय विभागास प्राप्त झालेली आहे. परंतु, आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती पूर्ण स्वरुपात खासगी संस्थांकडून प्राप्त झाली नाही. त्यामुळे इंडियन मेडिकल असोशिएशन (आयएमए) नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) या संस्था व सर्व खासगी वैद्यकिय व्यवसायिकांनी त्यांच्या संस्थेमधील आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी,वार्डबॉय, वार्डआया, सफाई कामगार, लॅब टेक्निशियन, सोनोग्राफी टेक्निशियन, रुग्णालयातील वाहनचालक,स्वागतिका व कार्यालयातील कर्मचारी यांची माहिती पालिकेच्या वैद्यकिय विभागात सादर करावी. जेणेकरुन कोविड-19 लसीकरणापासून अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी/कर्मचारी वंचित राहणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *