Hinjewadi Crime news: व्यावसायिकांना 27 लाखाचा गंडा; कंपनीला टाळा लावून मालक पसार

Hinjewadi Crime news: व्यावसायिकांना 27 लाखाचा गंडा; कंपनीला टाळा लावून मालक पसार
Pckhabar- इलेक्ट्रिकल वस्तूंची ऑर्डर देऊन कंपनी मालकाने तीन व्यावसायिकांना तब्बल 27 लाख 57 हजाराचा गंडा घातला. त्यानंतर कंपनी मालक कार्यालयाला टाळा लावून पसार झाला. याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रेश वर्दे असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. योगेश्वर शिवाजीराव सूर्यवंशी (वय 31, रा. धायरी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 ते 22 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला. आरोपी वर्दे याची टेक्नो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या नावाने कंपनी आहे. त्याने कंपनीसाठी फिर्यादी योगेश्वर यांच्याकडे इलेक्ट्रिक वायर, कॉइल देण्यासाठी 8 लाख 43 हजार रुपयांची ऑर्डर दिली. दिलेल्या ऑर्डर प्रमाणे फिर्यादी योगेश्वर यांनी वर्दे याच्या कंपनीत साहित्य पोहोचवले. त्या मालाचे पैसे देण्यासाठी वर्दे याने फिर्यादी यांना धनादेश दिला. तो धनादेश बाऊन्स झाला. हाच प्रकार योगेश शंकर राऊत यांच्यासोबत देखील घडला आहे. वर्दे याने राऊत यांना 8 लाख 47 हजार रुपयांचा दिलेला धनादेश बाऊन्स झाला. तसेच शंकर शरण बसवेश्वर रुमी यांना देखील वर्दे याने 10 लाख 65 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश देखील बाऊन्स झाला. या तीनही प्रकरणात मिळून वर्दे याने 27 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर मोबाईल बंद करून कंपनी कार्यालयाला कुलूप लावून वर्दे पसार झाला. फौजदार वरूडे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *