Pcmc GB news: ‘पास्को’वरून महासभेत आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी!
Pckhabar- जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प मोशी कचरा डेपो येथे स्थलांतरित करणे, पंधरा वर्षे संचालनासाठी निविदा प्रक्रिया न करता पास्को संस्थेला देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. निविदेचा कालावधी संपला असताना प्रक्रियेस विलंब करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. काही नगरसेवकांची आयुक्तांशी बाचाबाची झाली.
शहरातील जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून पास्को संस्था करीत आहे. हा प्रकल्प वायसीएम रुग्णालयाच्या आवारात आहे. तो मोशी कचरा डेपो येथे स्थलांतरित करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प मोशी कचरा डेपो येथे स्थलांतरित करावा व तो पंधरा वर्षे संचालनासाठी पास्को संस्थेला देण्याचा प्रस्ताव होता. याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या काही नगरसेवकांचा विरोध होता.
‘‘सगळ्यांना अंधारात ठेवून काम सुरू आहे. जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्याचे काम पास्कोला न देता निविदा काढा. अन्यथा न्यायालयात जाणार आहे. पक्षनेते नामधारी आहेत, असे राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले.
भाजपच्या सीमा साळवे म्हणाल्या, पास्कोचा विषय निविदा प्रक्रिया राबवून यायला हवा होता. यात स्पर्धा झाली नाही. ज्या अधिका-यांमुळे विलंब झाला. त्यांच्यावर कारवाई का केली नाही. निविदा प्रकिया करून विषय राबवावा, सहा महिने मुदतवाढ द्यावी. अन्यथा आपण न्यायालयात जाऊ.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, पास्कोला पंधरा वर्षाचे काम कशासाठी? स्पर्धा व्हायला हवी. निविदा राबवा. विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ म्हणाले, विषय फेटाळून लावा. निविदा प्रक्रिया राबवून काम द्यावे. विलंब करणा-यांवर कारवाई करावी.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, पास्को विषयी कोणतीही तक्रार नाही. जैव वैद्यकीय कचरा प्रक्रियेसाठी शहरातील रुग्णालयांकडून आपण शुल्क घेतो. त्यातूनच पास्कोला रक्कम दिली जाते. त्यामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडत नाही.
त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा केला. म्हणाले, ”पास्को महापालिकेत 2006 पासून कार्यरत आहे. कोणालाही आर्थिक लाभ मिळवून देण्याचा हेतू नाही. 2005 मध्ये पंधरा वर्षांसाठी करार केला होता. ही जागा वायसीएममधून प्रकल्प अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव 2012 चा आहे. पण, त्याला दिरंगाई झाली. यावर निर्णय घेण्यासाठी विषय सभागृहासमोर आणला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा विरोध नोंदवून पास्को विषय मंजूर केल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. त्यावरून भाजपाचे काही नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या हौदाजवळ आले. त्यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली.










Leave a Reply