कुरुळीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळले आठ कोरोना बाधित
Pckhabar- : खेड, कुरुळी येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत आठ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
3 हजार 108 घरातील 11 हजार 4 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 57 संशयित रुग्णामध्ये 8 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. 3 रुग्ण म्हाळुंगे, 1 चाकण, 2 दिघीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर दोघांना घरीच विलगीकरण केले आहे, अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी सारिका लहमाते यांनी दिली.
या मोहिमेची सुरुवात कुरुळीमध्ये पंचायत समिती सदस्य तथा बाजार समिती संचालक अमर कांबळे यांच्या उपस्थितीत झाली. ग्रामस्थांच्या कुटुंबांमधील सदस्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कांबळे यांनी केले. मोहिमेसाठी सर्व प्रभागांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी, स्वयंसेवक व नर्सिंग कर्मचाऱ्यांची पथके नेमण्यात आली आहेत.
कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी आणि बाधितांनी व कोरोनामुक्त झालेल्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे. या प्रसंगी सरपंच सचिन कड, माजी सरपंच देवराम सोनवणे, शरद मुन्हे, पोलिस पाटील प्रज्ञा कांबळे, आरोग्य अधिकारी सारिका लहमाते उपस्थित होते.










Leave a Reply