Solapur News : सोलापुरात मराठा आरक्षण स्थगिती विरोधात मराठा समाज आक्रमक 

सोलापुरात मराठा आरक्षण स्थगिती विरोधात मराठा समाज आक्रमक 

Pckhabar- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलाच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोलापूर शहर आणि जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

सोलापूर शहरासह मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, बार्शी, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये बंद कडकडीत पाळण्यात आला.         
माढा शहरात रस्त्यावर टायर जाळले तर पंढरपुरात जागरण गोंधळ घालत व पिराची कुरोली येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. 

 दरम्यान आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने आसूड ओढत मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष वेधत निवेदने दिली. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी संसदेत असल्याने त्यांच्यावतीने कार्यकर्त्यांनी निवेदन स्वीकारले. तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा आमदारांना निवेदने देण्यात आली . मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ठाम असून याप्रश्नी सरकार म्हणून कोर्टात १०० टक्के मराठा समाजाची बाजू मांडू तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन आमदार देशमुख आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. सोलापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने महिलांनी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहापासून आसूड ओढत आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले. 

 सोलापुरात एकीकडे सकल मराठा समाजाचे प्रवक्ते माउली पवार यांनी सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक दिली होती. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शांततेत आंदोलन केले. याशिवाय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने चार हुतात्मा पुतळा येथे सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास आसूड मारून निषेध व्यक्त करण्यात आला. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *