अष्टविनायक गणपतींचा इतिहास आणि माहिती; सातवा आणि आठवा गणपती

अष्टविनायक गणपतींचा इतिहास आणि माहिती; सातवा आणि आठवा गणपती
Pckhabar-पीसी खबरच्या वाचकांसाठी अष्टविनायक गणपती, पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ गणपती, लाल बागचा राजा या महत्वाच्या गणपतींची माहिती आपणापर्यंत पोहचविण्याच्या मालिकेतील आजचा सातवा आणि आठवा गणपती.

सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर  
देऊळ लेण्याद्रीपासून 20 किमी आणि 45 मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो.

 श्री क्षेत्र विघ्नेश्वर मंदिर आणि परिसर

या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर 20 फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फुट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवर्‍या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.

आठवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती

पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून 2 तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती.

  श्री महागणपती मंदिर आणि परिसर
हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला 10 सोंडी आणि 20 हात आहेत. या मूर्तीला ’महोत्कट’ म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.

हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात. ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *