अष्टविनायक गणपतींचा इतिहास आणि माहिती; सहावा गणपती
Pckhabar- पीसी खबरच्या वाचकांसाठी अष्टविनायक गणपती, पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ गणपती, लाल बागचा राजा या महत्वाच्या गणपतींची माहिती आपणापर्यंत पोहचविण्याच्या मालिकेतील आजचा सहावा गणपती
सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर 8 व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.
श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर
या मंदिरापर्यंत पोचण्यास 307 पायर्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोर्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत. असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला 18 लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.










Leave a Reply