गणेश विसर्जनाबाबत सुयोग्य नियोजन करा – महापौर, पक्षनेत्यांच्या सुचना
Pckhabar-सार्वजनिक गणेशोत्सव 2020 गणेश विसर्जनाबाबत कोरोना कोविड -19 ची पार्श्वभूमी विचारात घेता योग्य ती दक्षता घेऊन गणेश विसर्जनाबाबत सुयोग्य असे नियोजन करावे, अशा सुचना महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अतिरिक्त आयुक्त यांना दिल्या.
या सुचनांनुसार महापालिकेचे सर्व क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त अजित पवार व संतोष पाटील यांनी गुगल मिटद्वारे ऑनलाईन मिटींग घेऊन गणेश विसर्जनाबाबत सध्याची स्थिती जाणून घेतली. क्षेत्रिय स्तरावर असणार्या अडचणी समजून घेवून समस्यांचे निराकरण करुन देण्यात आले आहे. तसेच,गणेश विसर्जनाबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या. ज्या स्वयंसेवी संस्था, घरगुती गणपती दान स्वरुपात स्विकारणार आहेत त्यांना व त्यांच्या वाहनांसाठी फक्त पाच व्यक्तिंकरीता संबंधित क्षेत्रिय अधिकारी परवानगी देतील.
ज्या स्वयंसेवी संस्था गणेश विसर्जनासाठी वाहनांवर पाण्याची टाकी बसविणार आहेत त्यांना देखील संबंधित क्षेत्रिय अधिकारी परवानगी देतील. तसेच गरज भासल्यास घरगुती स्वरुपातील श्रीगणेशाचे दान व निर्माल्य गोळा करण्यासाठी तशा पध्दतीची व्यवस्था क्षेत्रिय कार्यालय स्तरावरून करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थांनी संकलीत केलेल्या गणेश मूर्ती व निर्माल्य याचे विसर्जन करण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येईल. मनपाचे एकुण 32 प्रभागांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये एक कनिष्ठ अभियंता यांची स्वयंसेवी संस्थांसोबत समन्वयक म्हणून नेमणुक करण्यात आली असून त्यांचे मार्फत संपूर्ण गणेश विसर्जन कार्यक्रमावर ते देखरेख ठेवण्यात येणार आहे. शहरावर आलेले कोरोनाचे संकट पाहता या गणेशोत्सव कालावधीत सर्व शहरवासियांनी आपली व इतरांची काळजी घेवून हा उत्सव साजरा करावा व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी केले आहे.
गणेश विसर्जनाबाबत सुयोग्य नियोजन करा – महापौर, पक्षनेत्यांच्या सुचना










Leave a Reply