मूर्तीदान व विसर्जन रथाचे उद्घाटन; नगरसेवक शितल शिंदे यांची अनोखी कल्पना

मूर्तीदान व विसर्जन रथाचे उद्घाटन; नगरसेवक शितल शिंदे यांची अनोखी कल्पना

Pckhabar- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन घाटावर करण्यास बंदी आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरामध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अनेक नागरिकांकडे मूर्ती विसर्जन करण्यासाठी सोय उपलब्ध नाही. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी भाजपचे नगरसेवक शितल शिंदे यांनी मूर्तीदान व विसर्जन रथाची संकल्पना राबविली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

गणेश मूर्तींचे दान व विसर्जन रथाचे उद्घाटन कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्धांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी कोविड योद्धे बाळासाहेब लोहकरे, कुणाल साठे, नितिन वाटकर, अमर गावडे, शेखऱ अहिरराव, सतीश नागरगोजे, संजय शेळके, संदीप जाधव, भूषण सोनवणे यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शहरात गणेशोत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षी महापालिकेच्या वतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी घाटावर सोय केली जाते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी घाटावर कोणतीही व्यवस्था केली नाही. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शितल शिंदे यांनी ही संकल्पना राबविली आहे.

याबाबत बोलताना शितल शिंदे म्हणाले, आपल्या सर्वांच्याच उत्सवावर यंदा करोनाचे सावट आहे. त्यामुळे सण साध्या पद्धतीने मात्र भक्तीभावाने साजरा करायचा आहे. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कोणत्याही नागरिकाची गैरसोय होऊ नये यासाठी हा रथ तयार केला आहे. या रथामध्ये नागरिकांनी आपल्या मूर्ती द्याव्यात. त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येईल. त्यामुळे नियमांचेही पालन होईल तसेच आपल्या लाडक्‍या बाप्पाला भक्तीभावाने निरोपही देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *