कोरोनाचा आर्थिक फटका, उत्सव काळातील हौसेला फाटा!

(दिपज्योती यादव-पवार)
Pckhabar- सण उत्सह म्हटले की आनंद…उत्साह…बाजारपेठामध्ये नागरिकांची तोबा गर्दी… नागरिकांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच प्रकारच आनंद दरवर्षी प्रत्येक सणाला असतो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी काही प्रमाणात आहे. मात्र, बाजारपेठेत आल्यामुळे आपल्याला कोरोना तर होणार नाही ना? अशी चिंता प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत आहे. प्रत्येकाचा चेहरा फेस शिल्ड, तोंडावर मास्क दिसून येत आहे. कोरोनाने अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले असल्यामुळे 2020 मधील सण, उत्सवात हौसेला फाटा देताना दिसत आहेत.

भारत हा विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. भारतातील विविध राज्याची वेगवेगळी संस्कृती, ओळख आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारतामध्ये विविध संस्कृतीचे जतन केले जात आहे. त्यामुळेच आजही भारतामध्ये विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सण आणि उत्सवांमध्ये सगळे लोक एकत्र येऊन हर्षउल्हासाचे वातावरण तयार होते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे विविध सण, उत्सव साजरे करण्यावर अनेक बंधने आणि निर्बंध आले आहेत. तसेच कोरोनाच्या या महासंकटामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून अनेक लहान-मोठे उद्योग आजही ठप्प आहेत. कोरोनाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्सव काळातील हौसेला सर्वसामान्य व्यक्ती फाटा देताना दिसत आहे.

महाराष्ट्राला संत, महात्मे राजे, महाराजे यांचा इतिहास आहे. महाराष्ट्रात विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, होळी, दहीहंडी असे महत्वाचे सण आहेत. मात्र मार्चच्या महिन्यापासूनच भारतासह महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. मार्चमध्ये साजर्‍या होणार्‍या होळीपासून रंगपंचमी, बकरी ईद, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला, रामनवमी हे सर्व सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. तर सण, उत्सवाच्या काळामध्ये हौस-मौस करण्याची संधी प्रत्येकाला असते.

कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे 2020 मध्ये प्रत्येकाच्या हौसेला मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय ठप्प झाला. यामध्ये श्रीमंतापासून ते श्रमिकापर्यंत असा एकही वर्ग चुकला नाही. अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले. यामुळे सण, उत्सव काळात होणार्‍या खर्चाला अनेकांनी फाटा दिला आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा म्हणाल्याप्रमाणे 2020 मध्ये नफ्याचा विचार करायचा नाही. सर्वांनी निरोगी राहून चांगले आयुष्य जगावे. त्याप्रमाणे अनेक नागरिकांचा दैनंदिन जीवन जगण्याकडे कल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *