कोरोनामुळे राष्ट्रवादीचे चार शिलेदार गमावले; माजी आमदार विलास लांडे यांना होतेय पोरकेपणाची जाणीव…!

कोरोनामुळे राष्ट्रवादीचे चार शिलेदार गमावले; माजी आमदार विलास लांडे यांना होतेय पोरकेपणाची जाणीव…!

Pckhabar-  गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरातील चार  शिलेदार आपल्या सर्वांना कायमचे सोडून गेले. माजी विरोधी पक्षनेते, कार्यकुशल नगरसेवक व आमचे सहकारी मित्र दत्ताकाका साने, माजी नगरसेवक व जनसामान्यांसाठी अहोरात्र झटणारे पक्षनिष्ठ एकनाथ  थोरात,  कार्यकुशल व्यक्तिमत्व, विद्यमान नगरसेवक जावेद शेख आणि आमचे मार्गदर्शक शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगनाथदादा फुगे अशा दिग्गज नेत्यांचं दुःखद निधन झाल्याने शहराची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. लोककल्याणासाठी आजन्म काम करणाऱ्या या दिग्गज लोकनेत्यांना  भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे यांनी
आदरांजली वाहत आपल्या भावना फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत.

   विलास लांडे आपल्या लेखात पुढे म्हणतात, जनसामान्यांसाठी कायम झटणारे, त्यांचा आवाज सभागृहात बुलंद करणारे, वेळप्रसंगी जनतेच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारे स्व. दत्ताकाका साने यांच्या जाण्याने साऱ्या शहरावरच शोककळा पसरली आहे. त्याच्या दुःखातून सावरतो ना सावरतो तोच राष्ट्रवादीचे खंदे शिलेदार आमचे परममित्र एकनाथ थोरात यांचंही दुःखद निधन झालं. सर्वसामान्य जनतेचे कैवारी, कार्यकुशल व्यक्तिमत्व, माणुसकीचा अथांग सागर जावेदभाई शेख यांच्या जाण्याने तर नियतीवरचा विश्वासच उडाला या सर्व सहकारी मित्रांच्या जाण्याच्या अतीव दुःखातून सावरत असतानाच पितृतुल्य मार्गदर्शक ज्येष्ठ लोकनेते रंगनाथराव फुगे यांनीही आम्हाला पोरकं केलं. नुकतेच आई वडिलांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो होतोच, त्यात पुन्हा एकदा त्याच यातनांचा कल्लोळात मन अगदी विषन्न होऊन गेलय. जनतेच्या सेवेसाठी आजन्म झटलेली हि सारी मंडळी सोडून गेल्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि मित्र परिवाराची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
  
    नियतीच्या इच्छेपुढे आपण मनुष्य किती खुजे आहोत याची जाणीव गेल्या काही काळातील या वेदनादायी अनुभवातून झाली. पण निराशावादी विचारांना बाजूला सारून लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य पणाला लावण्याची शिकवण छत्रपती शिवरायांपासून ते महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वानी आपल्याला दिलीय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ना. अजितदादा पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हीच शिकवण व प्रेरणा आपल्याला दिली.  याच प्रेरणेच्या जोरावर पुन्हा नव्याने भविष्याकडे पाहण्याची हिम्मत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परमेश्वरावरचा आमचा विश्वास अजूनही ढळला नाही. हे ईश्वरा, करूणाकरा तुझ्या अस्तित्वाची प्रचीती जगाला दाखवण्याची आता खरी वेळ आहे. कृपा कर आणि कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीतून समस्त मनुष्यजातीला मुक्त कर.
    स्व. दत्ताकाका साने, स्व. एकनाथ थोरात, स्व. जावेदभाई शेख आणि स्व. रंगनाथदादा फुगे या दिग्गजांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *