पिंपरी-चिंचवड शहरात लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत

 

पिंपरी-चिंचवड शहरात लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत
Pckhabar- ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पाचे शनिवारी मोठ्या उत्साहात घरोघरी, सार्वजनिक मंडळांनी स्वागत केले. बाप्पाच्या स्वागताला वरूणराजाने हजेरी लावली होती. दरवर्षी प्रमाणे वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे अनेकांनी टाळले. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती घरी आणली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा चाळीस हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आणि बंधने आली आहेत. दरवर्षी गणरायाचे वाजत-गाजत धुमधडाक्यात स्वागत केले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या   सावटाखाली शहरातील घरोघरी, सार्वजनिक मंडळांनी सुरक्षित अंतराचे पालन करत त्याच उत्साहात बाप्पाचे स्वागत केले.

दरम्यान, गणरायासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, मखर, विद्युतमाळा आदी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचे संकट असूनही बाजारांमध्ये गर्दी दिसून आली. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळशी, पत्री आदी साहित्य अनेकांनी खरेदी केले. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही भाविकांनी मिठाईच्या दुकानाबाहेर गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *