‘कोरोना व स्ट्रेस अर्थात ताण-तणाव’ ; वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा लेख

‘कोरोना व स्ट्रेस अर्थात ताण-तणाव’ ; वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा लेख
(भाग-१)
Pckhabar- आजच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक व्यक्ती कसल्याना ना कसल्या तरी ताणतणावा खाली असते. ताण – तणाव, चिंतामुक्त व्यक्ती सापडणे कठीण. सुख, दुःख हे मानवी जीवनात ऊन सावलीच्या खेळा प्रमाणे येत -जात असतात. पण आजच्या बदलत्या जीवन शैलीत ही ताण-तणाव,चिंता या गोष्टी मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनलेल्या आहेत. म्हणूनच सध्याच्या युगाला ” चिंतेचे युग” म्हणतात. Stress, Strain, Tension, Anxiety, Dipression हे सर्व शब्द साधारणपणे ताण-तणाव, दडपण, चिंता, नैराश्य या अर्थाने वापरले जातात. यात थोडाफार फरक आहे. परंतु लेखाच्या दृष्टीने हे शब्द समानार्थी म्हणून वापरले आहेत, ते ताण-तणाव या अर्थाने घ्यावेत.
भारतासह जगभरातील १९८ देशात कोरोनाची महासाथ आली. जगातील प्रत्येक गोष्टीवर या महासाथीचा परिणाम झाला. तसाच तो मानवाच्या मानसिक आरोग्यावर झाला. कोरोनाचे संपर्क साखळी तोडण्यासाठी चार लॉकडाउन झाले व आता अनलॉक सुरू आहे. या काळात मानसिक आरोग्य अत्यंत ‘स्ट्रेसफुल’ बनले. या काळात लोकांच्या मानसिक आरोग्यावर काय परिमाण झाले, याची पाहणी”युअर दोस्त”नावाच्या संघटनेने केली आहे. ती काय आहे हे पाहण्यापूर्वी थोडा स्ट्रेस संबंधी विचार करू.
एखादे कार्य करण्याची जबाबदारी जेव्हा अचानकपणे अंगावर येऊन पडते तेव्हा ते कार्य पार पाडण्यासाठी शरीरांतर्गत जे बदल घडून येतात, त्यास ताण असे म्हणतात. हा ताण निर्विकारी (चांगला) व विकारी अशा दोन प्रकारचा असतो. येथे विचार करायचा आहे तो विकारी ताणाचा. मानवी जीवनात चिंतनाला फार महत्व असते. चिंतन दोन प्रकारचे असते१)सकारात्मक २)नकारात्मक. आज अनेक कारणांनी सकारात्मक चिंतन करणे कमी वा बंद झाले असल्याने नकारात्मक चिंतनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ‘षड् रिपू’ बलवान होऊ लागले आहेत.आज येणारी अनेक संकटे मानवी मनावर आघात करीत आहेत. परिणामी ताण- तणाव वाढतच चालले आहेत.
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन. या प्रवासात बाल्य, तारूण्य, प्रौढत्व, व वृद्धावस्था या प्रत्येक अवस्थेतील स्थित्यंतराच्या वेळी मानसिक दडपण व तणाव वाढत असतो. स्वभाव,मानसिक स्थिती व परिस्थिती अशी अनेक कारणे मानसिक ताण- तणावाची असतात. ती वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व राजकीय यावरही अवलंबून असतात.
अमेरिकन मानसिक तज्ञ अल्बर्ट ऐकिन्स यांनी तीन प्रकारे मानसिक ताण-तणाव होतो असे म्हटले आहे.१)माणसाच्या स्वतः बद्दलच्या कल्पना २)त्याच्या इतरांच्या कडून असणाऱ्या अपेक्षा ३) त्याने स्वतः ठरवलेली ध्येय, स्वप्ने यात काही बदल होणे, चुका होणे. माणसाने स्वतः च्या इच्छा, भावना व विचार इतरांजवळ मनमोकळे पणाने न सांगणे, व्यक्त न करणे हे ही एक मानसिक ताण-तणावाचे महत्त्वाचे कारण आहे. तसेच अनुवंशिकता, अतिमहत्वाकांक्षा, अतिलोभीपणा, भावनिक अपरिपक्वता इ. ही मानसिक तणाव निर्माण करणारे काही घटक आहेत.
डॉ. खोराल यांच्या मते १)अनावश्यक वेग, घाई, अधिक हाव २)अपेक्षा व अंतर यात मोठी दरी असणे.३)उपभोगांच्या प्राप्तीत मागे पडल्याची चिंता यांनी मानसिक ताण-तणाव निर्माण होतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे भारतीय तत्वज्ञानात वर्णन केलेले ‘षडरिपूच’ ताणतणाव सहित सर्व मानसिक रोग होण्यास कारणीभूत आहेत.
ताण-तणाव हा किती प्रमाणात, कोणत्या स्वरूपाचा तसेच मानसिक बल कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून असतो. शारीरिक व मानसिक आजारांचा एकमेकांवर परिणाम होतो. म्हणूनच दोघांचे ही आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *