नगरसेविकेचा फोन ‘रेकॉर्ड’ करणा-या अधिका-याला निलंबित करा; महापौरांचा आयुक्तांना आदेश
Pckhabar- नगरसेवकावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. तो वॉर्डातील मंत्री असतो. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुस-या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणा-या अधिका-याला तत्काळ निलंबित करा असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील दोन महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यस्थानी आहेत. भाजपच्या संत तुकारामनगर येथील नगरसेविका सुजाता पालांडे म्हणाल्या, प्रभागातील कामे होत नाहीत. अधिकारी कामाला टाळाटाळ करत आहेत. कामांसाठी कनिष्ठ अभियंत्याला फोन केला असता अधिका-यांने फोन रेकॉर्ड केला. तो फोन दुस-या नगरसेवकाला ऐकवला. या अधिका-यावर कारवाई करण्यात यावी.
दापोडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या, स्मार्ट सिटीअंतर्गत प्रभागात विकासकामे सुरु आहेत. त्याची कोणतीही माहिती दिली जात नाही. ठेकेदाराकडून दादागिरीची भाषा केली जाते. अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करावी.
त्यावर नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुस-या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणा-या अधिका-याला तत्काळ निलंबित करा असा आदेश महापौर ढोरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिला.










Leave a Reply