लाॅकडाऊन आणि मानसिक आरोग्य : वाचा मानसोपचार तज्ज्ञ अश्विनी कुलकर्णी यांचा लेख
Pckhabar- आपण सर्वच सध्या सारखे ऐकत आहोत कि लॉकडाउनमुळे मानसिक आरोग्य खालावत चालले आहे. लोकांवर मानसिक ताण येत आहे. सर्वानाच प्रश्न पडत असेल कि मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय? आणि त्याचा इतका विचार किंवा महत्व का देत आहेत? मी तर ठीक आहे, मला काय झाले तेव्हा, पण जेव्हा या सगळ्या परिस्थितीचा म्हणजेच लॉकडाउनचा सखोल विचार करतो, तेव्हा जाणवते कि या सर्व परिस्थितीचा सगळ्यांचा मनावर कुठेतरी परिणाम होत आहे.
आपल्या मनाला कायम एक आनंदी वातावरणात राहायला आवडते, सुरक्षित राहावे वाटते, जवळची माणसे सतत आपल्या आजूबाजूला असावीत असे वाटत असते. चालू घडामोडींमुळे ही सुरक्षिततेची भावना आपल्या मनाला मिळत राहते. छोट्या स्वरूपात झालेले बदल आपल्या दैनंदिन आयुष्यावर तितकासा परिणाम करत नाही. किंवा हे बदल आपल्या सुरक्षिततेला, भावनेला फारसा धक्का पोहोचवत नाहीत, पण ज्यावेळी आपल्या आजूबाजूला, आपल्या आयुष्यात मोठे किंवा असे अचानक काही बदल घडतात, तेव्हा मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, काळजी वाटू लागते किंवा ताण येऊ लागतो, भीतीचे वातावरण वाटू लागते. काही वेळेस आपलं मन त्यातून सावरतं देखील. पण सध्या नव्याने उद्भवलेल्या कोरोनाच्या अजब परिस्थितीत पुढेची काहीच दिशा सापडत नसल्यानं सतत आपल्याला चिंता आणि तणावाला सामोरं जायला भाग पाडत असते. हा सततचा ताण शरीर व मन या दोन्हींच्या आरोग्याला घातक ठरतो, आणि त्यामुळे आपल्याला सातवणाऱ्या चिंतेला आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. यासाठीच्या काही सोप्या उपाय योजना आपण जाणून घेऊ या.
सर्वात आधी आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करणं. आपलं मन आणि शरीर एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे जोडलेलं असतं. घडणाऱ्या बदलांचा मनावर आणि शरीरावर एकतरित्या परिणाम होत असतो. म्हणूनच यासर्वांवर उपाय म्हणजे मन शांत ठेवण्यासाठी श्वसनाचे विविध व्यायाम प्रकार करणे व ते श्वसनाचे प्रकार आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहेत. प्राणायाम आणि ध्यानधारणा करणे फायद्याचे आहेत . ही त्याचीच काही उदाहरणं आहेत. आणि तुम्हाला माहित नसेल तरी देखील काळजी करण्याचं काहीच कारण नाही. एका ठिकाणी शांत बसून दीर्घ श्वास घेणं हाही एक उत्तम उपाय आहे. दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनिटं हा व्यायाम केल्यानं मनावर सकारात्मक परिणाम होतो. मनातला गोंधळ कमी होण्यास मदत होते.
सोबतच आपण माइंडफुलनेसच्या (mindfulness) एका तंत्राचा सुद्धा खूप चांगला उपयोग करू शकतो. म्हणजेच काय तर एका ठिकाणी डोळे बंद करून शांत बसायचे, आणि आजूबाजूच्या परिसरातून, निसर्गातून येणारे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करून पाहायचा. त्यावेळी फक्त आणि फक्त आवाज ऐका. अगदी हळुवार येणाऱ्या मंद वाऱ्याचा देखील, कोणताही विचार करायची गरज नाही. आहे त्या क्षणाचा तिथल्या वातावरणात रमण्याचा प्रयत्न करा. आपण करत असलेल्या कृतीत मग्न असणं, याला माइंडफुलनेस म्हणतात. चिंता कमी करण्यासाठी आणि तणावासाठी हा व्यायाम खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडेल.
त्याच बरोबरीने तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे? नेमका प्रश्न काय आहे? हे स्पष्ट झालं की, तो प्रश्न सोडवायला मदत होईल. सर्वात आधी स्वतःलाच प्रश्न विचारा किंवा जवळच्या व्यक्तीशी बोलून मन मोकळे करा. काही उत्तर मिळते का ते पहा. गरज लागल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका.










Leave a Reply