‘आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे घेऊन गणेशोत्सव साजरा करा’
Pckhabar-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तळेगाव दाभाडे आणि परिसरामध्ये यावर्षी होणार्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप न देता साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे यावर्षी 22 ऑगस्ट रोजी श्री गणेशाचे आगमन होत आहे. याचे नियोजन करण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अमरनाथ वाघमोडे यांनी तळेगाव दाभाडे परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे आयोजित केली होती. या बैठकीस तळेगावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सव साजरा करताना शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घालून दिलेल्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. या परिपत्रकांमध्ये मंडळानी गणेशोत्सव साजरा करताना मर्यादित स्वरूपाचा मंडप उभारावा, सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट व घरगुती दोन फूट असावी, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करावी, या शिबिरांच्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगू इत्यादी आजार यांचे प्रतिबंधात्मक उपाय व स्वच्छता याबाबत जनजागृती करावी, आरती अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भात नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी,
श्री गणेशा दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात यावी, मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्कॅनिंग, स्क्रीनची व्यवस्था करण्यात यावी, दर्शन घेऊ इच्छिणार्या भाविकांसाठी सोशल व स्वच्छतेचे नियम इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे, श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये, विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे, लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.
संपूर्ण चाळीतील इमारतीतील व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, महापालिका विविध मंडळी गृहनिर्माण संस्था लोकप्रतिनिधी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी, कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका पोलिस स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या नियमाचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. अधिसूचना याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना वाचून दाखवण्यात आल्या.
या सूचना वाचन केल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांनी वरील सूचनांचे पालन करून, साध्या पद्धतीने मिरवणुक विरहीत, डामडौल न करता श्री गणेशाचे आगमन मिरवणूक व मधल्या काळातील आरत्या इतर कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणूक याबाबत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने परंतु उत्साहाने गणेश उत्सव साजरा करण्यात येईल, असे सामुदायिक मत व्यक्त केले.
‘आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे घेऊन गणेशोत्सव साजरा करा’










Leave a Reply