गणेशमूर्तीच्या दरात 15 ते 20 टक्यांनी वाढ
Pckhabar- गणेशोत्सव नऊ दिवसांवर आला आहे. आपल्या घरची गणेश मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी गणेश मूर्ती स्टॉल मध्ये वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे सुमारे 15 ते 20 टक्यांपर्यंत भाववाढ झाली आहे.
येत्या 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यादृष्टीने पिंपरी- चिंचवड शहरात विक्रेत्यांनी मुर्त्या विकण्याची दुकाने थाटली आहेत.
मूर्ती स्वतः बनविणारे आणि मुर्त्या विकत आणून विक्री करणार्यांनी अशी दुकाने तात्पुरत्या स्वरूपात उभारली आहेत. शहराच्या विविध भागात विक्रेत्यांची लहान मोठी दुकाने सुरू केलेली आहेत. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुर्त्या बनविणारे कारखाने अनेक महिने बंद असल्याने मूर्तीच्या उत्पादन संख्येवर मर्यादा आलेली आहे.
यावर्षी मूर्तीच्या किमतीत दरवाढ झाली असून मूर्तीच्या आकार व उंची कमी ठेवण्यात आलेली आहे. सुमारे 251 पासून पुढे रकमेच्या मुर्त्या सर्रास विक्रीस आहेत. मुर्त्या विक्रेते तसेच गणरायाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. विविध दुकानामध्ये घरगुती सजावटीचे सामानही विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहे.
कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याने कार्यकर्ते, विविध मंडळे यांची धावपळ पूर्णपणे थांबलेली आहे. काही सार्वजनिक मंडळांनी लहानमूर्ती आणि साधी आरस करणार असल्याचे नियोजन केले आहे. घराघरांमध्ये ही गणेश उत्सव अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गणरायाचे उत्साहाने पण साधेपणाने आगमन होणार आहे.
याबाबत त्रिवेणीनगर येथील तेलंगे गणेश मुर्ती स्टाॅलचे संदीप तेलंगे म्हणाले, लाॅकडाऊनमुळे पेणच्या गणेश मुर्त्या मिळाल्या नाहीत. स्थानिक कारखानदारांनी किंमती वाढवल्यामुळे 15 ते 20 टक्के दरवाढ झाली आहे. दरवर्षी 250 ते 300 मुर्ती विक्रीसाठी ठेवतो. मात्र, यावर्षी गणेश मुर्त्याच मिळाल्या नसल्यामुळे 70 ते 80 मुर्त्या ठेवल्या आहेत. शाडूच्या मुर्त्याचा तुटवडा आहे.
सांगवीतील श्री गणपती स्टाॅलचे मीनाताई घारे आणि संजय घारे म्हणाले, लाॅकडाऊन आणि कोकणात आलेल्या चक्री वादळामुळे कोकणातून येणाऱ्या गणेश मुर्त्या यावर्षी आल्या नाहीत. सरकारने दोन फुटांपर्यंत गणेश मुर्त्या बसविण्याचा नियम केला आहे. त्यामुळे आपल्याकडे चार इंचापासून दोन फुटांपर्यंत गणेश मुर्त्या ठेवल्या आहेत. लहान मुर्त्यांना अधिक मागणी आहे. शाडू मातीच्या मुर्त्यांची प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या अडीच पट किंमत असते. त्यामुळे शाडू मातीच्या मुर्त्यांची जास्त मागणी नाही.










Leave a Reply