आमदार शेळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
Pckhabar- तळेगाव-चाकण- शिक्रापूर हा 54 किलोमीटर लांबीचा मावळ, खेड, शिरुर तालुक्यातील औधोगिक क्षेत्रास जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. महामार्गाची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचा सर्वेक्षण अहवाल तयार करून त्याचा भारतमाला प्रकल्पात समावेश करावा व त्याच्या कामास लवकरात लवकर सुरवात करावी, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
आमदार शेळके यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तळेगाव- चाकण- शिक्रापूर महामार्ग हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक क्षेत्रांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गावरून सतत अवजड वाहतूक व मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असते. मात्र, या रस्त्याची रुंदी कमी असल्याने व रस्त्याची वारंवार दुरवस्था होत आहे व महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करावा व तातडीने या कामास सुरवात करण्यात यावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
यावेळी गडकरी यांनी तत्काळ मुंबईचे मुख्य महाव्यवस्थापक तांत्रिक प्रादेशिक अधिकारी राजेश सिंग यांना फोन करून तळेगाव -चाकण- शिक्रापूर महामार्गाची पाहणी करून त्या महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या. आमदार शेळके यांनी गडकरी यांचे आभार मानले.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करा – आमदार सुनील शेळके










Leave a Reply