सर्व रुग्णालयांनी महात्मा फुले विमा योजना सुरू करावी – आयुष प्रसाद

सर्व रुग्णालयांनी महात्मा फुले विमा योजना सुरू करावी – आयुष प्रसाद

Pckhabar- पुणे जिल्ह्यामध्ये जी काही रुग्णालय आहेत. त्या सर्व रुग्णालयाने महात्मा फुले विमा योजना सुरू करावी. त्यासाठी त्वरित ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
     तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात मावळ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुष प्रसाद बोलत होते. याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, मावळ मुळशीचे प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहरे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत,तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवी पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी वाजे, मायमरच्या विश्वस्त सुचित्रा नांगरे, डॉ. स्वाधीन ढाकणे, डॉ. संदीप कुमार तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची डॉक्टर्स आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
       प्रसाद यांनी उपस्थित अधिकार्‍यांना कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी  सूचना दिल्या.  तालुक्यामध्ये कोरोना रुग्णासाठी अ‍ॅम्बुलन्सची सुविधा मोफत करावी, सर्व रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणार्‍या बिलाच्या संदर्भात शासकीय अधिकार्‍यांची नेमणूक करावी, रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला महात्मा फुले विमा योजनेतून सुविधा प्राप्त होणार की नाही हे स्पष्ट करावे.किंवा होणार असेल तर त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात याची माहिती द्यावी. तळेगाव दाभाडे नगरपरिषद  हद्दीतील गॅस शवदाहिनीवर शवाचे दहन करताना मोफत करावे .यासाठी सभेमध्ये ठराव मंजूर करून घ्यावा. तालुक्यामध्ये लोणावळ्यापासून देहूरोड पर्यंत तसेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णासाठी मोफत अ‍ॅॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी.
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक जास्त,जास्त ब्लड प्रेशर असलेले नागरिक व व्यसनाधीन असलेल्या नागरिकांना घरीच आयसोलेशन मध्ये ठेवण्यात यावे. जर  त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल तर शासनाने घालून दिलेले सर्व नियम ते पाळतात की नाही त्याची पहाणी करावी.तसेच मायमर मेडिकल कॉलेज येथे 720 बेड उपलब्ध आहेत. परंतु  कोरोना कक्षासाठी अल्प प्रमाणात या कॉलेजमध्ये बेड दिलेले आहेत. ते वाढून घेण्याची सूचना तहसीलदार व तालुका आरोग्य प्रमुख यांना देण्यात आल्या.
  आमदार सुनील शेळके म्हणाले कोरोना रुग्णासाठी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था मोफत असावी. रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर केलेल्या उपचारांचे बिल हे जास्त नसावे रुग्णालयाच्या बाहेर उपचारासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता लावा, आदी सूचना शेळके यांनी यावेळी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *