पिंपरी पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘यांच्या’त चूरस

पिंपरी पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘यांच्या’त चूरस

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. नवीन विरोधीपक्षनेता कोण असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नाना काटे यांचा कार्यकाल संपल्याने अजित पवार यांनी इच्छूकांची नावे मागविली आहेत.

प्रभाग क्रमांक पाच गवळीनगरचे पालिकेत प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे विरोधी पक्षनेतेपसाठी प्रबळ दावेदार आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांचा पराभव करुन राष्ट्रवादीच्या चिन्हावर अजित गव्हाणे निवडून आले आहेत.

प्रभाग क्रमांक नऊ मासूळकर कॉलनी, नेहरुनगरमधून दुस-यावेळी निवडून आलेल्या वैशाली घोडेकर माजी महापौर आहेत. 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्या अपक्ष निवडणूक लढल्या. पण, थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र, उमेद न हारता 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या दुस-यावेळी निवडून आल्या आहेत. तीन पुरुषांना संधी दिल्याने आता महिलेला संधी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

तिसरे इच्छूक राजू मिसाळ भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या प्रभाग क्रमांक 15 प्राधिकरणातून सलग तीस-यावेळी निवडून आले आहेत. उपमहापौर, क्रीडा समिती सभापतीपद त्यांनी भूषविले आहे. विरोधात असताना सलग दोन वर्ष ते स्थायी समितीचे सदस्य होते.

पालिकेची आगामी निवडणूक 15 महिन्यांवर येवून ठेपली आहे. जनतेसमोर जायचे आहे. त्याची गणिते समोर ठेवूनच पक्षश्रेष्टी विरोधी पक्षनेता निवडतील. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणा-या अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे. या तिघापैकी कोणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडते की ऐनवेळी वेगळ्याच नगरसेवकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *