‘टॅटू’ काढण्यावरून मित्राचा खून; मोबाईल लोकेशनव्दारे पाठलाग करून पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात

‘टॅटू’ काढण्यावरून मित्राचा खून; मोबाईल लोकेशनव्दारे पाठलाग करून पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात

Pckhabar – ‘टॅटू’ काढण्यावरून आणि जुन्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगार असलेल्या आपल्या मित्राचाच खून केला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री 11 च्या सुमारास दिघी रोड येथे घडली. आरोपी लातूरला पळून जात असताना मोबाईल लोकेशनव्दारे पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले असल्याचे भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले.

मयूर हरिदास मडके (वय 26, रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी
रोशन हरी सोडतकर (रा. दिघी रोड), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवनग्रा, लातूर), प्रणेश चंद्रकांत घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क,दिघी) आणि वैभव तानाजी ढोरे (रा. भवानी पेठ, पुणे) यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.

मयूर आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. शनिवारी रात्री मयूर आणि त्याचे दोन आरोपी मित्र दिघी रोडवर दारू प्यायला बसले होते. त्यानंतर त्यांचे इतर मित्र दारू पिऊन तिथे आले. ‘मै बडा का, तू बडा’ याच्यावरून त्याच्यात वादावादीला सुरुवात झाली. त्यात ‘टॅटू’ काढण्यावरून वाद विकोपाला गेला. त्यातूनच आरोपींनी मयूर याच्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला.

खून करून आरोपी लातूरला पळून जात होते. याचा सुगावा लागण्याने पोलिसांनी मोबाईल लोकेशनव्दारे त्यांचा पाठलाग केला. सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर आरोपींना ताब्यात घेतल्याचे अवताडे यांनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *