लक्षणेविरहित रुग्ण होताहेत ‘होम आयसोलेट’, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड मिळण्यास होते मदत

लक्षणेविरहित रुग्ण होताहेत ‘होम आयसोलेट’, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड मिळण्यास होते मदत

सध्या 1700 रुग्ण होम आयसोलेट; घरीच उपचार घेऊन 7 हजार 555 रुग्ण झाले बरे

Pckhabar – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लक्षणे विरहित रुग्णांना ‘होम आयसोलेट’ होण्याच्या पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. आजपर्यंत बाधित झालेल्या 25 हजार रुग्णांपैकी 9 हजार रुग्णांनी घरीच उपचार घेतले. त्यातील 7 हजार 555 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या  1700 रुग्ण होम आयसोलेट असून त्यामध्ये दररोज वाढ होत आहे. यामुळे श्वासनाचा त्रास, गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास मदत होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या 25 हजार पार झाली आहे. त्यापैकी 17,647 बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 6765 सक्रिय रुग्ण आहेत. 435 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या 50 हजार होण्याचा अंदाज प्रशासनाचा आहे.

‘या’ रुग्णांना केले जाते ‘होम आयसोलेट’!

एखादा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला लक्षणे कशी आहेत. त्याची प्रकृती घरी ठेवण्या योग्य आहे का, लक्षणेविरहित असेल. रुग्ण घरी राहून औषधोपचार घेऊन बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांना वाटले. रुग्णाची परवानगी असेल. रुग्णाच्या  घरी स्वतंत्र रुम, स्वच्छतागृह, काळजी घेण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती असेल अशा रुग्णांनाच ‘होम आयसोलेट’ची परवानी दिली जाते. या रुग्णांची नावासह माहिती पालिकेकडे असते.  होम आयसोलेट असलेल्या रुग्णांची पालिका योग्य ती काळजी घेते. पहिले दहा दिवस पालिकेच्या वॉर रुम, कॉल सेंटरमधून रुग्णाला दररोज फोन केले जातात. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. लक्षणे आहेत का, ताप, खोकला, श्वास घ्यायला अडचण येत आहे का, हे विचारले जाते. रुग्णाला त्रास होत असल्यास रुग्णवाहिका पाठवून पुढील उपचारासाठी रुग्णालयात आणले जाते.

दहा दिवसानंतर काही त्रास होत असल्यास, अडचण आल्यास रुग्णाने स्वत: फोन करुन पालिकेला सांगणे आवश्यक आहे. होम आयसोलेट रुग्ण राहत असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वावर कोविड रुग्ण असल्याचा फलक लावला जातो. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तो परिसर सॅनिटाईझ केला जातो.  

आजपर्यंत बाधित झालेल्या 25 हजार रुग्णांपैकी आत्तापर्यंत तब्बल 9 हजार रुग्ण होम आयसोलेट झाले होते. त्यातील दहा दिवस पूर्ण झालेले 3170 रुग्ण पॅसिव्ह होम आयसोलेशन आहेत. काही त्रास होत असेल तर या रुग्णांनी स्वत:हून पालिकेला सांगणे आवश्यक असते. तर होम आयसोलेशन पूर्ण झालेले 4385 रुग्ण आहेत. 7 हजार 555 रुग्णांचे आयसोलेशन पूर्ण झाले आहे. ते घरी उपचार घेऊन ठणठणीत झाले आहेत. आज 1700 रुग्ण होम आयसोलेट आहेत. या रुग्णसंख्येत दररोज वाढ होते असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लक्षणे विरहित आणि घरी सोय असलेल्या रुग्णांना होम आयसोलेट होण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 9 हजार रुग्णांना होम आयसोलेटची परवानगी दिली होती. त्यातील 7 हजार 555 रुग्णांचे आयसोलेशन पूर्ण झाले आहे. होम आयसोलेट रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाते. लक्षणे विरहित रुग्ण होम आयसोलेट असल्याने लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. श्वासनाचा त्रास होणा-या रुग्णांसाठी बेडची उपलब्धता होण्यास मदत होते. ज्या रुग्णाला बेडची आवश्यकता आहे. त्याला बेड मिळण्यास मोठी मदत होते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *