जय श्रीरामच्या घोषणा देत भाजपकडून आनंदोत्सव

जय श्रीरामच्या घोषणा देत भाजपकडून
आनंदोत्सव
Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. गेल्या ५०० वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं आहे. या आनंदाच्या क्षणाचे आज मोरवाडी येथील पिंपरी चिंचवड़ शहर भाजपा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत
आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भाजपचे सर्व पदाधिकारी अयोध्या येथील लाईव्ह भूमीपुजन सोहळ्याचे साक्षीदार झाले. तसेच, भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्यासह इतर पदाधिकाऱयांच्या हस्ते मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच, एकमेकांना लाडू भरवून “जय जय जय श्रीराम” अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहर संघटन अमोल थोरात, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संदिप कस्पटे,  माजी नगरसेवक राजु दुर्गे, प्रदेश सदस्य अमित गोरखे, अनुप मोरे, संजय परळीकर, धनंजय शाळीग्राम, अमोल दामले, निखिल काळकुटे उपस्थित होते. त्याचप्रमाणे शहरात लाडू वाटण्यात आले. 

आमदार महेशदादा लांडगे म्हणाले की, संविधानाच्या अंतर्गत आणि शांतातमय वातावरणात समस्यांचं निराकरण कसं होऊ शकतं हे पंतप्रधानांनी आज दाखवून दिलं आहे. राम मंदिराच्या प्रतीक्षेत अनेक पिढ्यांचं बलिदान आहे. त्यासाठी संघर्ष आणि साधना सुरू होती. लोकशाहीचा आणि संविधानाच्या अंतर्गत राहून यातून मार्ग निघाला. राम जन्मभूमिसाठी अनेकांनी बलिदान दिलं. गेल्या ५०० वर्षांपासूनच्या स्वप्नाची पूर्तता राम मंदिर भूमीपूजनाने झाली आहे. आजचा दिवस म्हणजे इतक्या वर्षांचं फलित आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. आता मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, कोरोनामुळं हा कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचं पालन करून झालं पाहिजे तसंच देशातील नागरिकांनी केलं. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे. आज देशातील नागरिकांच्या सहकार्यानं हे काम पूर्ण होत आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतीक आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले आहेत. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शहर संघटन अमोल थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *