Talegaon news: प्रभागातील समस्या मांडण्यासाठी ॲपची निर्मिती; नगरसेवक निखिल भगत यांचा स्तुत्य उपक्रम

Talegaon news: प्रभागातील समस्या मांडण्यासाठी ॲपची निर्मिती; नगरसेवक निखिल भगत यांचा स्तुत्य उपक्रम
Pckhabar-कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांशी भेटता येत नाही, त्यांच्या अडी-अडचणी, समस्या जाणून घेता येत नाहीत. मात्र, तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नगरसेवक तथा बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत यांनी नागरिकांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी त्यांनी एक विशेष ॲप तयार केले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिक भगत यांचे कौतुक करत आहेत.

कोरोनामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधींना भेटता येत नाही. आपल्या समस्या मांडता येत नाहीत. नागरिकांची  गैरसोय होऊ नये म्हणून प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक तथा बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी व कामासंदर्भातील तक्रार निवारण सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून मोबाईल ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘नगरसेवक निखिल भगत’ या नावे आहे. प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने व्हावे, नागरिकांच्या सूचना, शासकीय योजना या सर्व बाबींची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी,या उद्देशाने ॲप सुरू करण्यात आले आहे.

तळेगाव शहरातील नागरिकांसाठी ॲप उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच उपक्रम असून नगरसेवक भगत यांचे नागरिक कौतुक करत आहेत.

याबाबत नगरसेवक तथा बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत म्हणाले ”कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे प्रभागातील नागरिकांना इच्छा असतानाही भेटता येत नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, नागरिकांशी संपर्कात राहण्यासाठी ॲप निर्मितीची संकल्पना राबविण्याचा विचार आला. त्यानुसार ॲपची निर्मिती करण्यात आली. या ॲपला प्रभागातील नागरिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *