Pimpri crime news: तीन डॉक्टरांना चार दिवसांची पोलीस कोठडी

ही बातमी शेअर करा.

Pimpri crime news: तीन डॉक्टरांना चार दिवसांची पोलीस कोठडी
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील मोफत कोविड रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपी डॉक्टरांना न्यायालयाने 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्पर्श प्रा. लि. चे डॉ. प्रवीण शांतवन जाधव, वाल्हेकवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक भरत राळे आणि डॉ. सचिन श्रीरंग कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप (वय 55, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा.चिखली) यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमिट करण्यासाठी पैसे लागतात. यामधील 80 हजार रूपये डॉ. जाधवने तर वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्टरांना दिले. उपचारादरम्यान सुरेखा वाबळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी जाधवला त्वरीत अटक करण्यात आली. मात्र, आरोपी डॉ. राळे व कसबे पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच मृत्यू झालेल्या सुरेखा वाबळे यांना रूग्णालयात दाखल करताना त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. त्याही गायब असल्याचे तपासात समोर आले आहे.

  याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, मोफत बेडसाठी आरोपींनी आणखी कोणाच्या नातेवाईंकांकडून पैसे घेतले आहेत का? याचा पोलीस तपास करत आहेत. असे पैसे घेतले असतील तर नागरिकांनी समोर यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


ही बातमी शेअर करा.