Pimpri news: मोफत कोरोना बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी तीन डॉक्टर गजाआड

ही बातमी शेअर करा.

 

Pimpri news: मोफत कोरोना बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी तीन डॉक्टर गजाआड
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील मोफत कोविड रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन डॉक्टरांना अटक केली आहे.

स्पर्श प्रा. लि. चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप (वय 55, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे ( रा. रामदास नगर, चिखलीगाव) यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमिट करण्यासाठी पैसे लागतात. यामधील 80 हजार रूपये डॉ. जाधवने तर वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्टरांना दिले. उपचारादरम्यान सुरेखा वाबळे यांचा मृत्यू झाला.

यानंतर हे प्रकरण भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी उघडकीस आणले होते. तर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यावरून बराच गदारोळ झाला होता. आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून कारवाई करावी, असा तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.


ही बातमी शेअर करा.