Pimpri News: रूग्णवाढ आटोक्यात, मात्र गाफील राहू नका : खासदार कोल्हे

Pimpri News: रूग्णवाढ आटोक्यात, मात्र गाफील राहू नका : खासदार कोल्हे
Pckhabar- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. तरीदेखील कोणीही गाफील न राहता कोरोना संबंधित नियमांचे काटेकोर पालन करुन स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी येथील जम्बो कोवीड-19 सेंटरला तसेच ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील कोवीड- 19 रुग्णालयाला खासदार डॉ. कोल्हे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा आणि माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जम्बो कोवीड-19 सेंटर येथील भेटीवेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, जम्बो कोवीड रुग्णालयाचे समन्वयक डॉ. सुनिल पवार, व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले आदी उपस्थित होते. ऑटो क्लस्टर येथील कोवीड-19 रुग्णालयाच्या पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे देखील उपस्थित होते.

कोवीड सदृश लक्षणे दिसत असतील अथवा कोवीड बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करुन निदान करणे गरजेचे आहे.  त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर कोवीड बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे असे नमूद करुन खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे.

कोरोना बाधितांवर उपचार करताना रेमडेसीवीरचा अवाजवी वापर थांबवणे गरजेचे आहे.  ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता आहे अशा योग्य रुग्णांना रेमडेसीवीर दिले पाहिजे.  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रेमडेसीवीरची वितरण प्रणाली योग्य पध्दतीने कार्यरत आहे.  रेमडेसीवीर कशा पध्दतीने उपलब्ध होते याची माहिती करुन दिल्यास नागरिकांची धावपळ होणार नाही. जम्बो कोवीड-19 सेंटरच्या माध्यमातून जवळपास 800 पेक्षा अधिक रुग्णांना सेवा देणे ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.
यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कोवीड-19 वॉररुमला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *