Pimpri news: धक्कादायक! स्पर्श संस्था चालवत असलेल्या महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णांची लूट; 1 लाख रुपये घेऊन रुग्णाला बेड
मोफत असतानाही पैसे घेऊन दिले जातात बेड
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ऑटो क्लस्टरमधील कोविड हॉस्पिटल संचलन करणाऱ्या स्पर्श संस्थेचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आयसीयूची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगत ‘एक लाख रुपये द्या आम्ही बेड मिळवून देतो’, असे सुचविले. एक लाख रुपये घेऊन त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टरममध्ये दाखल करून घेतले. ही सुविधा मोफत असताना एक लाख रुपये घेतल्यामुळे संचलन करणाऱ्या स्पर्शचे बिंग फुटले. स्पर्शच्या सल्लागाराने 80 आणि खासगी हॉस्पिटलचालकाने 20 हजार रुपये घेतल्याची कबुली दिल्याचे अत्यंत विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू आहे. स्पर्श संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. चिखली येथील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला कोरोनाची लागण झाली होती. त्या वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आयसीयू बेडची आवश्यकता लागेल असे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. ‘आम्ही तुम्हाला आयसीयू बेड मिळवून देतो, हॉस्पिटलचे नाव सांगत नाहीत. फक्त एक लाख रुपये भरावे लागतील’ असे सांगितले. नातेवाईकांनी एक लाख रुपये दिले. एक लाख रुपये मिळाल्यानंतर स्पर्श संचलन करत असलेल्या महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमधील मोफत असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मुख्याध्यापिकेचे बुधवारी (दि.28) दुर्देवाने निधन झाले.
मुख्याध्यापिकेकडून ऑटो क्लस्टरममध्ये दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याची माहिती चिखलीतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्यासह गुरुवारी ऑटो क्लस्टर गाठले. तिथे पैशे घेतल्याबाबत विचारणा केली असता खासगी हॉस्पिटलने घेतले असतील असे त्यांनी सांगितले. या नगरसेवकांनी आपला मोर्चा खासगी हॉस्पिटलकडे वळविला. तेथील डॉक्टरला जाब विचारला. डॉक्टरला चोपही दिला. त्यावर या डॉक्टरने ‘स्पर्श’च्या ‘प्राविण्य’ असलेल्या सल्लागाराचे नाव घेतले. त्याने 80 हजार रुपये घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर हा सगळा गैरप्रकार उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी दिवसभर हे प्रकरण चालू होते. हे प्रकरण रफादफा करण्यासाठी सत्ताधारी भाजपचे काही नेते प्रयत्न करत होते ही निंदनीय बाब आहे. शहरवासीयांनी ज्यांच्यावर आपली जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी चुकीच्या प्रकारला साथ देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
आता आयुक्त राजेश पाटील मोफत सुविधा असतानाही रुग्णांकडून लाखो रुपये घेणाऱ्या ‘स्पर्श’ संस्थेवर आणि खासगी हॉस्पिटलवर काय कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड नसल्याचे सांगितले जाते. पण, महापालिका खर्च करत असलेल्या
ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैसे घेऊन बेड दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वीही एकाही रुग्णांवर उपचार केले नसताना स्पर्शने महापालिकेला पाच कोटी रुपयांची खोटी बिले सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.










Leave a Reply