Pimpri news: कामगारांचे लसीकरण कारखान्यातच करावे
Pckhabar- पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीमध्ये जवळपास पाच ते सहा हजार मोठे व लघुउद्योग आहेत. औद्योगिक कारखान्यात काम करणार्या कामगारांची संख्या सुमारे 3 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे कामगारांचे महापालिकेने कारखान्यातच लसीकरण करून घ्यावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
याबाबत बाबर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या 60 ते 70 हजारांच्या संख्येमध्ये वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ही संख्या दररोज जवळपास 3 हजारांच्या आसपास वाढत आहे व ही खूप चिंताजनक बाब आहे, तसेच रुग्णांची ही गुणाकाराच्या रूपात संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. शहरामध्ये बेड , व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 ते 45 मधील नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वयोवर्षातील कामगार बहुसंख्येने औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करत आहेत. यामुळे जर त्यांना कारखान्यातच लसीकरण करण्याची परवानगी दिली व महापालिकेने त्याचे आयोजन कारखान्यातच केले तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खूप मदत होईल. महापालिकेचे मनुष्य बळ , व्यवस्थापनाचा ताण, तसेच जागेच्या उपलब्धतेचा प्रश्नही कमी होईल. या बाबींचा विचार करून महापालिकेने औद्योगिक कारखान्यातील कामगारांचे लसीकरण कारखान्यातच करावे अशी मागणी बाबर यांनी केली आहे.










Leave a Reply